Sonam Wangchuk: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘संसद मोर्चा’ दरम्यान जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या बळाच्या वापराचा आणि लाठीचार्जचा निषेध करत प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपल्या या निर्णयाची अधिकृत माहिती दिली.
खासदारांची भेट मिळेपर्यंत उपोषण मागे नाही
आपली भूमिका स्पष्ट करताना सोनम वांगचुक यांनी सांगितले की, शांततापूर्ण मार्गाने न्याय मागणाऱ्या तरुण आंदोलकांवर प्रशासनाने अत्यंत क्रूर पद्धतीने कारवाई केली आहे. जोपर्यंत या युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन लोकप्रतिनिधींना भेटण्याची आणि आपले म्हणणे मांडण्याची अधिकृत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत ते अन्नत्याग आंदोलन चालूच ठेवतील.
Activist Sonam Wangchuk tweets, "Seeing the brutality with which peacefully protesting Youth are being dealt with, I have decided to continue my fast untill the youth leaders are allowed to meet the Parliamentarians at the Sansad Bhawan or l am allowed to meet them here at the… pic.twitter.com/KAxqaBvZcC — ANI (@ANI) July 20, 2026
शिक्षणमंत्र्यांच्या उत्तरदायित्वाची मागणी
आपल्या पत्रातून वांगचुक यांनी आशा व्यक्त केली की, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत सरकार शिक्षण मंत्र्यांना उत्तरदायी धरेल. पोलिसांनी चिथावणी देऊनही तरुणांनी अत्यंत संयम आणि शांतता राखल्याबद्दल त्यांनी आंदोलकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी संसदेसमोर आपले गाऱ्हाणे मांडून या समस्येवर कायदेशीर मार्ग काढावा, यासाठी पोलीस आणि प्रशासनाने त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बॅरिकेड्सवरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक
दुसरीकडे, सुरक्षेच्या कारणास्तव जंतर-मंतर आणि संसद भवन परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. हजारो आंदोलक संसदेकडे कूच करत असताना पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.