Kolhapur Nagarpalika: राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जवळ येत असताना स्थानिक राजकारणात अनपेक्षित घडामोडी वेग घेत आहेत. महायुती सत्तेत असली तरी त्यांच्या गोटात अंतर्गत नाराजी उसळल्याचे संकेत अधिक बळकट होत आहेत. विशेषत: कोल्हापूरात तर राजकीय पटावर अचानक अशी चाल खेळली गेली आहे की सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोल्हापुरातील शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिकांमध्ये, वर्षानुवर्षे आमनेसामने असलेले भाजप आणि काँग्रेस एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचा भाजप गट आणि सतेज पाटील यांचा काँग्रेस गट यांनी एकत्रितपणे निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
यड्रावकर यांच्या विरोधात एकजूट
जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) चे आमदार राजेंद्र यड्रावकर विरुद्ध स्थानिक भाजप नेतृत्वाकडून नाराजी सुरूच होती. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे त्यांच्याशी सूर न जुळल्याने भाजपने त्यांच्याविरोधातच पवित्रा घेतला आहे. या नाराजीतूनच भाजप-काँग्रेस एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोलण्यात येत आहे.
हेही वाचा – Mumbai Redevelopment : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!; जुन्या इमारतींमधील भाडेकरूंना आता मोठा दिलासा
शिरोळ-जयसिंगपूरमध्ये ‘विकास आघाडी’चा फॉर्म्युला
अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये आघाडीच्या चर्चांना उधाण आले होते. शेवटी अर्ज माघारीची मुदत जवळ आल्यावर प्रमुख नेत्यांची बैठक झाली आणि ‘जयसिंगपूर विकास आघाडी’ या नावाने संयुक्त पॅनेल उभे करण्याचे ठरवले गेले. यामुळे महायुतीचा स्थानिक गणिताचा ताळमेळ बिघडला असून शिंदे गटाला या भागात पूर्णपणे एकटे पाडण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भाजप-काँग्रेसची ही अनपेक्षित हातमिळवणी कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. जुने वैर विसरून दोन परंपरागत विरोधी पक्ष एकत्र येण्यामागे नक्की कोणती रणनीती आहे, हा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत या आघाडीचा परिणाम महायुतीतील संबंधांवर कसा होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.