US-China Standoff: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा विस्कळीत झालेला असतानाच, आता जागतिक व्यापाराचा दुसरा महत्त्वाचा मार्ग असलेल्या 'पनामा कालव्या'वरून अमेरिका आणि चीन यांच्यात मोठा वाद उफाळून आला आहे. पनामाच्या सर्वोच्च न्यायालयाने कालव्याच्या धोरणात्मक बंदरांबाबत दिलेल्या एका निकालानंतर हा तणाव वाढला असून, याचा थेट फटका भारतीय जहाजांना आणि अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे गंभीर आरोप; चीनकडून प्रत्युत्तर
अमेरिकन सिनेटर मार्को रुबियो यांनी चीनवर पनामावर आर्थिक दबाव टाकल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. चीन पनामाचा ध्वज असलेली जहाजे रोखून धरत असून, याद्वारे या महत्त्वाच्या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. यामुळे जागतिक व्यापाराचा खर्च वाढून त्याचा भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, चीनने हे सर्व आरोप फेटाळून लावत, अमेरिका स्वतःचा 'साम्राज्यवादी अजेंडा' राबवण्यासाठी खोटा प्रचार करत असल्याचे म्हटले आहे.
'पेट्रोडॉलर' विरुद्ध 'पेट्रोयुआन'ची लढाई?
तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष केवळ एका कालव्यापुरता मर्यादित नसून तो जागतिक चलनावर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरू असलेल्या खऱ्या युद्धाचा भाग आहे. चीन आता कच्च्या तेलाचा व्यापार अमेरिकन डॉलरऐवजी स्वतःच्या 'युआन'मध्ये करण्यावर भर देत आहे. तसेच, इराणला रशिया आणि चीनकडून मिळणारी लष्करी मदत आणि बदल्यात चीनला मिळणारा स्वस्त तेल पुरवठा, यामुळे अमेरिकेची अस्वस्थता वाढली आहे. याच तणावामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपला चीन दौरा मे 2026 पर्यंत पुढे ढकलला आहे.
पनामा कालव्याचे महत्त्व आणि भारताची भूमिका
सुमारे 82 किमी लांब असलेला हा कालवा पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरांना जोडणारा जगातील सर्वात महत्त्वाचा 'शॉर्टकट' आहे. या मार्गामुळे जहाजांना दक्षिण अमेरिकेला वळसा घालण्याचा 15,000 किमीचा प्रवास टाळता येतो. भारत आपली अमेरिकेकडे जाणारी जहाजे याच मार्गाने पाठवतो. जर हा मार्ग बाधित झाला, तर भारतीय वस्तूंना 13,000 किमीचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल, ज्यामुळे महागाई प्रचंड वाढू शकते. पनामामध्ये सध्या 15,000 हून अधिक भारतीय नागरिक वास्तव्यास असून, हे शहर भारतीय उद्योगांसाठी एक प्रमुख 'लॉजिस्टिक्स हब' बनले आहे.
हेही वाचा – US Iran Israel War: सावधान! इराण युद्ध 40 दिवसांच्या पुढे गेलं जेवणच महागणार; FAO कडून जगाला गंभीर इशारा
चीनची वाढती पकड
पनामा कालव्याच्या परिसरात चिनी कंपन्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. 1997 सालापासून 'बाल्बोआ' आणि 'अटलांटिक' या दोन महत्त्वाच्या बंदरांचे कामकाज एका चिनी उपकंपनीकडे आहे. तसेच, या कालव्यावरून होणाऱ्या एकूण मालवाहतुकीपैकी 21.4 टक्के माल हा एकट्या चीनमधून येतो. या वाढत्या प्रभावामुळेच अमेरिका आणि चीनमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.