NCP Sharad Pawar : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राजकीय पक्षांमध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांना खिंडार पाडत भाजपने मोठी 'इनकमिंग' केली असून, यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलली आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये राहुल कलाटेंचे 'कमळ' हाती
पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते. कलाटे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची ताकद कित्येक पटीने वाढल्याचे मानले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का
पिंपरीपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्येही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रेणुकदास उर्फ राजू वैद्य यांच्यासह विधानसभा संघटक अक्षय खेडकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचे दोन महत्त्वाचे मोहरे फुटल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा – Sudhir Mungantiwar : 'आता तो विषय…' सुधीर मुनगंटीवारांचा नाराजीनाट्यावर पडदा! मोठा निर्णय घेणार?
भाजपची वाढती ताकद आणि प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया
राहुल कलाटे यांच्या प्रवेशानंतर रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळेच भाजप परिवाराला मिळणारे जनसमर्थन वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. समाजहिताची तळमळ असणारा प्रत्येक कार्यकर्ता भाजपमध्ये सामील होण्यास उत्सुक असल्याचे सांगत त्यांनी आगामी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचा वेग
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून नेत्यांची आपापल्या सोयीनुसार पक्ष बदलण्याची धावपळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिकेतही महाविकास आघाडीला निष्प्रभ करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकांवर होणार परिणाम
राहुल कलाटे, राजू वैद्य आणि अक्षय खेडकर यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन मोठ्या शहरांमधील सत्ता समीकरणांवर याचा थेट परिणाम होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत हा पक्षबदल भाजपला विजयापर्यंत नेणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा – BMC Elections Mahayutiv vs MVA : सेना भाजप एकत्र लढण्याची मानसिकता पण…; शिरसाट नेमकं काय म्हणाले?