Amol Kolhe on Fuel Crisis : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रशिया-युक्रेन आणि इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन टंचाई आणि वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली जनतेला महागाईच्या खाईत लोटले जात असून, देशाची आर्थिक कोंडी होत असताना सरकार आणि पंतप्रधान मौन का आहेत, असा सवाल त्यांनी सोशल मीडियाद्वारे उपस्थित केला आहे. डॉ. कोल्हे यांनी या गंभीर परिस्थितीवर तातडीने संसदेची संयुक्त समिती (PJC) बोलावण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यानुसार लावून धरली आहे.
चाकण आणि भोसरी एमआयडीसीला इंधन टंचाईचा फटका
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील विदारक स्थिती मांडली आहे. त्यांच्या शिरूर मतदारसंघातील चाकण एमआयडीसी (Chakan MIDC) सह हडपसर आणि भोसरी पट्ट्यातील उद्योगांना ऊर्जा आणि इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अनेक कंपन्या केवळ 50 टक्के क्षमतेने सुरू असून काहींनी उत्पादने पूर्णपणे थांबवली आहेत. यामुळे कामगारांच्या हाताला काम उरलेले नाही आणि उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय युद्धाचे निमित्त करून देशांतर्गत उद्योगांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रशिया, युक्रेन आणि इराण-इस्रायलमधील युद्धाचे पडसाद उमटतायत खरंय, पण त्या आडून जनतेला महागाईच्या खाईत लोटणं हे कोणत्या धोरणात बसतं? माझ्या मतदारसंघातील चाकण MIDC असो वा हडपसर-भोसरीचा पट्टा; आज उद्योगांना ऊर्जेचा आणि इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवतोय. अनेक कंपन्या ५०% क्षमतेने… — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 11, 2026
शेतमाल सडतोय आणि बंदरांवर साखर धूळ खात आहे
केवळ उद्योगच नाही, तर इंधन दरवाढ आणि विसकळीत पुरवठ्यामुळे शेती क्षेत्रावरही मोठे संकट आले आहे. डॉ. कोल्हे यांनी नमूद केले की, गॅस पुरवठा खंडित झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले असून कष्टकऱ्यांचा रोजगार जात आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक महागली असून शेतकऱ्यांची हक्काची साखर बंदरांवर धूळ खात पडून आहे. योग्य वेळी वाहतूक न मिळाल्याने अनेक ठिकाणी शेतमाल सडून जात असून, सरकार यावर तोडगा काढण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘विश्वगुरु’चा डांगोरा पिटणारे सरकार मौन का?
देशाची आर्थिक कोंडी होत असताना पंतप्रधान आणि सरकार ‘विश्वगुरु’ असल्याचा डांगोरा पिटत आहेत, मात्र प्रत्यक्ष कृती शून्य आहे, अशी खोचक टीका डॉ. कोल्हे यांनी केली. जे परराष्ट्र धोरण देशांतर्गत सुरक्षा आणि स्वस्त जीवन देऊ शकत नाही, ते धोरण फसलेले आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मागणीनुसार, सरकारने तात्काळ पार्लमेंटरी जॉइंट कमिटीची (PJC) बैठक बोलावून या संकटावर सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
जनतेला जपून वापरण्याचे आणि जागृत राहण्याचे आवाहन
सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगत डॉ. कोल्हे यांनी जनतेला गॅस आणि इंधनाचा वापर अत्यंत जपून करण्याचे आवाहन केले आहे. “सरकार झोपले आहे, मात्र आपण जागृत राहूया,” असे म्हणत त्यांनी संकटाच्या काळात एकमेकांना आधार देण्याची विनंती तमाम नागरिकांना केली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आधार घेऊन सामान्यांची लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, ही मागणी आता जोर धरू लागली आहे.