Char Dham Yatra 2026: उत्तराखंडमध्ये निसर्गाचे तांडव! केदारनाथमध्ये 3 भाविकांचा मृत्यू, चार धाम यात्रा तूर्तास स्थगित

मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाने केदारनाथ यात्रेवर तात्पुरती स्थगिती दिली आहे.

Char Dham Yatra 2026: उत्तराखंडमध्ये निसर्गाचे तांडव! केदारनाथमध्ये 3 भाविकांचा मृत्यू, चार धाम यात्रा तूर्तास स्थगित

Char Dham Yatra 2026:  उत्तराखंडमध्ये रविवारी खराब हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून चार धाम यात्रेवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे प्रशासनाने केदारनाथ यात्रेवर तात्पुरती स्थगिती दिली आहे. दरम्यान, केदारनाथ धाम परिसरात प्रकृती बिघडल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या (SEOC) माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांत आपत्तीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

केदारनाथ यात्रेदरम्यान तीन भाविकांचा मृत्यू

रुद्रप्रयाग जिल्ह्यात 30 मे रोजी एका दिवसात तीन भाविकांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील 76 वर्षीय गोपाल मिश्रा हे केदारनाथ दर्शन करून परतत असताना अचानक आजारी पडले. फाटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गुजरातमधील अहमदाबादचे रहिवासी नवघनजी लक्ष्मणजी ठाकूर (52) यांचाही दर्शनासाठी जात असताना मृत्यू झाला. तसेच तेलंगणातील हैदराबादचे रहिवासी बालागानी बालाराजू (49) यांची केदारनाथ परिसरात प्रकृती खालावल्याने मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ऑरेंज अलर्टनंतर यात्रेवर निर्बंध

भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर रुद्रप्रयाग प्रशासनाने सकाळी 10 वाजल्यापासून यात्रेकरूंच्या पुढील हालचालींवर निर्बंध घातले. मार्गावर असलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबविण्यात आले असून त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

चार धाम यात्रेत आतापर्यंत 26 लाखांहून अधिक भाविक

या वर्षीच्या चार धाम यात्रेत आतापर्यंत 26 लाख 91 हजार 574 भाविकांनी दर्शन घेतले आहे. केदारनाथ धाममध्ये 10 लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली असून बद्रीनाथमध्ये 7 लाख 51 हजार 283, यमुनोत्रीत 4 लाख 47 हजार 164 आणि गंगोत्रीत 4 लाख 58 हजार 334 भाविकांनी दर्शन घेतले आहे. या हंगामात यात्रेशी संबंधित मृत्यू किंवा बेपत्ता होण्याच्या 138 घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

उत्तरकाशीत महिला ट्रेकर बेपत्ता

उत्तरकाशी जिल्ह्यातील बुग्याल ट्रेकदरम्यान नैनितालची रहिवासी बबिता पांडे या महिला ट्रेकर 30 मे रोजी बेपत्ता झाल्या. वन विभाग, स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी शोधमोहीम राबवली, मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. SDRF, पोलीस आणि वन विभागाच्या 17 सदस्यीय पथकाकडून शोधकार्य सुरू आहे.

शॉर्ट सर्किटमुळे शेडला आग

उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयाजवळील आयुर्वेदिक रुग्णालय परिसरात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत शेडमध्ये साठवलेले साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले.

बागेश्वरमध्ये ट्रेकर बेपत्ता, चंपावतमध्ये तरुणाचा मृत्यू

बागेश्वर जिल्ह्यात पिंडारी ग्लेशियर ट्रेकवरून परतत असताना नोएडाचा ट्रेकर अभिषेक चौहान बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी SDRF आणि पोलिसांची मदत घेतली जात आहे. तर चंपावत जिल्ह्यात 25 वर्षीय लखविंदर सिंग उर्फ बब्बू हा युवक सुमारे 200 मीटर खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडला.

गंगोत्री यात्रेतही तीन भाविकांचा मृत्यू

गंगोत्री आणि यमुनोत्री यात्रेदरम्यानही तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील 67 वर्षीय लक्ष्मी दामोदर रामटेकर आणि त्यांचे पती दामोदर रामटेकर (76) यांचे गंगनानी परिसरात प्रकृती बिघडल्याने निधन झाले. तसेच मध्य प्रदेशातील हरिम मोहन कलाराम (61) यांचा यमुनोत्री पदयात्रा मार्गावर मृत्यू झाला.

रस्ते अपघात आणि नैसर्गिक आपत्तींमुळे वाढती चिंता

SEOC च्या अहवालानुसार, 1 जानेवारी 2026 पासून उत्तराखंडमध्ये झालेल्या रस्ते अपघातांमध्ये 125 जणांचा मृत्यू झाला असून 427 जण जखमी झाले आहेत. टेहरी, पिथौरागढ, डेहराडून आणि अल्मोडा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. याशिवाय 1 एप्रिलपासून नैसर्गिक आपत्तींमुळे 12 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा – Medicine MRP Rules India: मधुमेह, हृदयविकारासह 30 अत्यावश्यक औषधांच्या किमती निश्चित; MRP पेक्षा जास्त पैसे मागितल्यास होणार कारवाई

5 जूनपर्यंत खराब हवामानाचा इशारा

हवामान विभागाने राज्यातील पर्वतीय भागांसाठी पुढील काही दिवस अतिवृष्टी, मेघगर्जना, गारपीट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. 3,500 मीटरपेक्षा जास्त उंचीवरील भागांमध्ये हिमवर्षावाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. डेहराडून, टेहरी, नैनिताल, चंपावत, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ही परिस्थिती 5 जूनपर्यंत कायम राहू शकते.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र आणि हवामान विभागाने भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. भूस्खलनप्रवण भागांपासून दूर राहावे, मेघगर्जना सुरू असताना घराबाहेर पडू नये, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number