Devyani Farande BJP Nashik : नाशिक भाजपमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत असून, स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध डावलून माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजप आमदार देवयानी फरांदे अत्यंत संतापल्या असून, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना आपले अश्रू अनावर झाले. आमदार देवयानी फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून देखील उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.
स्थानिक विरोधानंतरही पक्षप्रवेश
नाशिक भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या प्रवेशाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला होता. त्यांच्या मते, या दोन्ही नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. "मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि गेल्या 40 वर्षांत स्वतःवर अन्याय झाला तरी मी कधीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली नाही," असे सांगताना फरांदे यांना गहिवरून आले.
हेही वाचा – Prashant Jagtap : नव्या वाटेवरचा जुना खेळाडू ! प्रशांत जगताप आज 'या' पक्षात करणार अधिकृत प्रवेश
कार्यकर्त्यांचा बळी जाण्याचा प्रश्न
देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेला मुख्य मुद्दा हा कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा होता. त्या म्हणाल्या की, मतदारसंघातील सक्षम उमेदवार बबलू शेलार आणि इतर जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पॅनल तयार केले असते, तर पक्षाचा विजय निश्चित होता. वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना झुकते माप दिले जात असेल, तर कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहायचे? "माझ्यासमोर जर माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल, तर ते मी सहन करू शकत नाही," अशा शब्दांत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला संताप व्यक्त केला.
नेत्यांची भूमिका आणि पक्षाची शिस्त
पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करत त्यांनी नवीन सदस्यांचे स्वागत तर केले; पण "आज जे काही घडले ते मला अजिबात आवडलेले नाही," असेही स्पष्टपणे सुनावले. प्रत्येकाने केवळ स्वतःचाच विचार करायचा ठरवले, तर पदाधिकाऱ्यांना पाठबळ कोण देणार, असा रोकठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिक भाजपमधील या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांपूर्वी जुने आणि नवे असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.