Nana Patole Aggressive over LPG Crisis : इराण-इस्रायल युद्ध आणि जागतिक भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतात निर्माण झालेल्या इंधन आणि गॅस टंचाईवरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इस्रायलसमोर गुडघे टेकल्याचा गंभीर आरोप केला आहे. या ‘सरेंडर’ धोरणामुळेच आज देशातील सामान्य जनतेला गॅस आणि इंधनासाठी वणवण करावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण परिस्थितीला केंद्र सरकारचे चुकीचे परराष्ट्र धोरण जबाबदार असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसने केला आहे.
इंधन टंचाईचा जनजीवनावर मोठा परिणाम
नाना पटोले यांनी राज्यातील विदारक परिस्थिती मांडताना सांगितले की, गॅस टंचाईमुळे मुंबईतील 80 टक्क्यांपेक्षा जास्त हॉटेल्स बंद पडली आहेत. केवळ हॉटेल्सच नाही, तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुला-मुलींनाही जेवणाचे वांदे होत असून त्यांना आपल्या गावी परत जावे लागत आहे. घरगुती गॅसचा पुरवठा विसकळीत झाल्याने महिलांना पुन्हा चुलीकडे वळावे लागत आहे किंवा वीजेच्या शेगड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गॅस सिलिंडरसाठी नागरिक 2 किलोमीटर लांब रांगेत उभे असून काळ्या बाजारात सिलिंडरसाठी 2000 रुपयांपर्यंत मोजावे लागत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पुरवठ्यात कोणतीही कमतरता नसल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात जनता मात्र रस्त्यावर रांगेत उभी आहे, हा विरोधाभास त्यांनी दाखवून दिला.
राज्यभरात काँग्रेसचे ‘सरेंडर दे सिलेंडर’ आंदोलन
सरकारच्या या धोरणाविरोधात काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रात ‘सरेंडर दे सिलेंडर’ ही मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर आंदोलने करून सरकारचा निषेध केला जात आहे. सरकार झोपलेले असून त्यांना जनतेचे हाल दिसत नाहीत, असा आरोप करत काँग्रेसने आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर जनतेचा संताप अनावर झाला असून सरकारविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचेही पटोले यांनी नमूद केले.
तप्रधानांच्या धोरणावर कडाडून टीका; कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय पेच
काँग्रेस नेत्यांच्या मते, भारताने इराणकडून मिळणारा स्वस्त तेल आणि गॅसचा पुरवठा अमेरिकेच्या दबावाखाली येऊन नाकारला आहे. इस्रायलला दिलेल्या पाठिंब्यामुळे इराणशी असलेले संबंध ताणले गेले असून त्याचा फटका भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बसला आहे. “पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत असून त्यांनी देशाचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे,” अशी टीका पटोले यांनी केली. पेट्रोलियम मंत्र्यांनी लोकसभेत 100 टक्के पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला असला, तरी रशिया आणि इतर देशांकडून इंधन खरेदी करण्याबाबत अमेरिकेने घातलेल्या अटींचे पालन करणे भारतासाठी कठीण जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. “जर आमच्या पंतप्रधानांमध्ये दम असेल, तर त्यांनी डोळ्याला डोळा भिडवून बोलले पाहिजे, मात्र सध्या ते केवळ मान झुकवत आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.