Praniti Shinde: संसदेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयक नामंजूर झाल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “हे महिला आरक्षण विधेयक नसून संविधानात छेडछाड करण्याचा भाजपचा डाव होता,” असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.
“बहुमत नव्हतं तर विधेयक मांडलंच कसं?”
प्रणिती शिंदे यांनी सरकारच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, मोदी आणि शाह यांची यंदाची ‘स्ट्रॅटेजी’ सपशेल फेल गेली आहे. दोन तृतीयांश बहुमत मिळणार नाही हे माहित असूनही केवळ महिलांच्या भावनांशी खेळण्यासाठी हे विधेयक मांडले गेले. हे विधेयक म्हणजे महिलांना अधिकार देणे नसून, विरोधकांना फसवून संविधानात बदल करण्याचा एक स्क्रिप्टेड प्रयत्न होता, अशी टीका त्यांनी केली.
आरएसएस आणि भाजपवर गंभीर टीका
आरएसएसवर हल्लाबोल करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “जे आज विरोधकांना महिला विरोधी म्हणत आहेत, त्याच आरएसएसमध्ये महिलांना कायम तुच्छ वागणूक दिली जाते. त्यांना खालचे स्थान दिले जाते, हे संपूर्ण देशाला माहित आहे. भाजपसाठी केवळ निवडणुका महत्त्वाच्या आहेत. उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये वाद निर्माण करून देशाची अखंडता मोडण्याचे काम हे सरकार करत आहे. 2023 मध्येच विधेयक संमत झाले असताना पुन्हा नवा घाट का? 543 खासदारांच्या विद्यमान संख्येतच आरक्षण द्यायला सरकारला काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“गुंडांना सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न”
मतदारसंघ पुनर्रचनेच्या आडून भाजप आपल्या पक्षातील ‘गुंडांना’ सुरक्षित जागा मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. “महिला आरक्षणाचा केवळ आडोसा घेतला असून प्रत्यक्षात त्यांना महिलांना कोणतेही अधिकार द्यायचे नाहीत. मोदींचा खोटा आणि भावनिक चेहरा आता जनतेसमोर उघडा पडला आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सुरक्षेचा प्रश्न
राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या सुरक्षेपेक्षा सरकारला राजकीय फायद्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना करण्यात जास्त रस आहे, हा अतिशय घाणेरडा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.