Chhagan Bhujbal on Petrol-Diesel Stock : महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी इंधन संपल्याचे फलक पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावरही या इंधन टंचाईचे अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. "राज्यात सध्या केवळ 1 महिन्याचा पेट्रोल-डिझेलचा साठा शिल्लक आहे," असे स्पष्ट करत हा तुटवडा केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नसून तो एक जागतिक प्रश्न बनल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिका-इराण युद्धाचा फटका; मोदींचे प्रयत्न सुरू
इंधन पुरवठा विसकळीत होण्यामागचे मूळ जागतिक राजकारणात असल्याचे छगन भुजबळ यांनी अधोरेखित केले. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगातील खनिज तेलाचा पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे. युरोप, जपान आणि खुद्द अमेरिकेतही इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. या जागतिक संकटातही इतर देशांच्या तुलनेत भारताची आर्थिक आणि साठवणुकीची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असल्याचे ते म्हणाले. भारताला इतर पर्यायी देशांमधून तेल कसे आयात करता येईल, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
30 जूनपूर्वी 'हे' काम करा, अन्यथा घरगुती सिलिंडर होणार बंद
राज्यातील केरोसीन (घासलेट) साठ्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, केरोसीनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु, ते विकणारी जुनी साखळी तुटल्यामुळे वितरणामध्ये अडचणी येत आहेत. नवीन परवाना हवा असल्यास सरकार तो देण्यास तयार आहे. यासोबतच त्यांनी पीएनजी (PNG) गॅस पाईपलाईन ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी दिली आहे. ज्या भागात गॅस पाईपलाईन पोहोचली आहे, तिथल्या नागरिकांना 30 जूनपूर्वी अर्ज करणे बंधनकारक आहे. जर पाईपलाईन असूनही 30 जूनच्या आधी अर्ज केला नाही, तर तुमचा घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा बंद केला जाईल, असा इशारा मंत्र्यांनी दिला आहे.
शरद पवारांच्या मोदी कौतुकावर भुजबळांची प्रतिक्रिया
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कौतुक केले होते, ज्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांचे समर्थन केले. "शरद पवार हे नेहमीच चांगल्या कामाला चांगले म्हणतात. ते राजकारणात विरोधी भूमिका जरूर मांडतील, पण जेव्हा देशाच्या हिताचा किंवा गंभीर समस्यांचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा ते नेहमीच सहकार्य करण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी पुढे असतात," असे भुजबळ यांनी आवर्जून नमूद केले.