Middle East War : पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आता अधिक तीव्र झाला असून, इराकच्या 'इस्लामिक रेझिस्टन्स' या सशस्त्र गटाने अमेरिकन लष्करी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांच्या विरोधात एक धोकादायक पाऊल उचलले आहे. या गटाने अमेरिकन हेर आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांसाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली असून, यामुळे या भागात तैनात असलेल्या अमेरिकन सैन्यापुढील आव्हाने वाढली आहेत.
जम्बो बक्षिसाचे स्वरूप आणि अटी
इराकमधील इस्लामिक रेसिस्टन्स गटाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, इराक आणि आसपासच्या प्रदेशात कार्यरत असलेल्या उच्च-स्तरीय अमेरिकन लष्करी किंवा गुप्तचर अधिकाऱ्यांची अचूक ओळख आणि त्यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला 150 दशलक्ष इराकी दिनारचे बक्षीस दिले जाईल. अमेरिकन डॉलर्समध्ये ही रक्कम अंदाजे 1,14,500 डॉलर्स इतकी असून भारतीय चलनात ती 9.5 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त होते. हे बक्षीस इराकी नागरिक आणि तिथे राहणाऱ्या परदेशी रहिवाशांनाही लागू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांची बदलती रणनीती
या गटांच्या दाव्यानुसार, जमिनीवरील युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अमेरिकन सुरक्षा दलांचे पर्याय मर्यादित झाले आहेत. परिणामी, अमेरिकन अधिकारी आता लष्करी तळांऐवजी पर्यायी नागरी ठिकाणांचा वापर करत आहेत, जे त्यांना सुरक्षित वाटतात. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासनही या गटाने दिले आहे. माहिती संकलित करण्यासाठी त्यांनी सुरक्षित संवाद मार्ग प्रस्थापित केल्याचा दावाही केला असून, यामुळे अमेरिकन दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हवाई हल्ल्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई
या बक्षिसाची घोषणा होण्यापूर्वी अवघ्या 24 तासांआधी या इराकी गटांनी अमेरिकेचे इंधन भरणारे विमान (KC-135) पाडल्याचा दावा केला होता. त्या अपघातात विमानातील सर्व 6 क्रू सदस्य ठार झाले. या पार्श्वभूमीवर, गुप्तचर माहितीसाठी जाहीर केलेले हे मोठे बक्षीस अमेरिकन सैन्यासाठी आणि त्यांच्या हेरगिरी यंत्रणेसाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे अमेरिकेला आपली रणनीती बदलण्यास भाग पडणार असून, इराकमधील परिस्थिती अधिक संवेदनशील झाली आहे.
प्रदेशात तणाव शिगेला
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता संपूर्ण मध्यपूर्वेत उमटत आहेत. अमेरिकेने इस्रायलला दिलेला पाठिंबा लक्षात घेता, इराकमधील हे गट थेट अमेरिकेला लक्ष्य करत आहेत. या घोषणेमुळे या प्रदेशात तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांच्या जीव धोक्यात आला असून, स्थानिक पातळीवर हेरगिरीचे जाळे सक्रिय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी काळात अमेरिका या धमकावणीला कसे उत्तर देते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – North Korea Attack : आखाती युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाचाही क्षेपणास्र हल्ला, दक्षिण कोरिया-जपान सतर्क