मार्गशीर्षातला पहिला गुरुवार! महालक्ष्मी व्रताचं महत्त्व आणि पूजनविधी जाणून घ्या

मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी श्रीमहालक्ष्मी व्रत केले जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी, शांती आणि धन-धान्य नांदते, अशी श्रद्धा आहे.

मार्गशीर्षातला पहिला गुरुवार! महालक्ष्मी व्रताचं महत्त्व आणि पूजनविधी जाणून घ्या

Margashirsha Guruvar Mahalaxmi Vrat Puja Vidhi 2025: सनातन धर्मात मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी असलेल्या माता लक्ष्मीला (Goddess Lakshmi) समर्पित आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी श्रीमहालक्ष्मी व्रत (Mahalakshmi Vrat) केले जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी, शांती आणि धन-धान्य नांदते, अशी श्रद्धा आहे. यंदा मार्गशीर्षातला पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025 रोजी येत आहे.

यंदाचे मार्गशीर्ष गुरुवार 2025:
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार : 27 नोव्हेंबर 2025 
मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार : 04 डिसेंबर 2025 
मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार : 11 डिसेंबर 2025 
मार्गशीर्षातला चौथा गुरुवार : 18 डिसेंबर 2025 

हे व्रत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आराधनेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत सलग 4 किंवा 5 गुरुवार (ज्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात जितके गुरुवार येतील त्यानुसार) केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन (Udyapan) केले जाते. हे व्रत केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

महालक्ष्मी व्रतासाठी आवश्यक साहित्य (Puja Samagri)
पूजेसाठी खालील साहित्य जमा करणे महत्त्वाचे आहे:
– पूजा साहित्य: कलश, ताम्हण, पळी-पंचपात्र, तांदूळ (अक्षता), हळद-कुंकू, गुलाल, रांगोळी, कापूस, कापसाचे वस्त्र (वस्त्रमाळ), नवीन वस्त्र (साडी/ओटीसाठी), अत्तर, सुपारी, विड्याची पाने.
– कलश व सजावट: कलशासाठी पाणी, कलशाखाली ठेवण्यासाठी तांदूळ किंवा गहू, आंब्याची पाने, श्रीफळ (नारळ), आरसा आणि फणी.
– इतर: देवीची मूर्ती किंवा प्रतिमा, चौरंग/पाट, आसन, तुपाचे/तेलाचे दीप (निरांजन).
– फुलं: लाल किंवा गुलाबी रंगाची फुले (विशेषतः कमळ किंवा गुलाबाचा पूजा साहित्यात समावेश केल्यास अधिक चांगले), हार आणि वस्त्रमाळ अर्पण झाल्यावर तुळस (Tulsi) अर्पण करावी.
– नैवेद्य: या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने पुरणपोळी (किंवा घरात केलेला कोणताही गोड पदार्थ), शिरा, लाडू, फळे (केळी, सफरचंद इत्यादी) आणि प्रसाद म्हणून लाह्या-फुटाणे अर्पण करण्याची पद्धत आहे.

हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एकूण खर्च किती आला? निधी कसा जमा झाला? जाणून घ्या…

कथा: मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा पुस्तक.
मार्गशीर्ष गुरुवारची संपूर्ण पूजा विधी (Margashirsha Guruwar Puja Vidhi)
वैभवप्राप्तीसाठी महालक्ष्मी व्रत करताना खालील विधीचे पालन करावे:
– तयारी: पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्रे परिधान करावीत.
– चौरंग मांडणी: घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूजागृहात स्वच्छ वस्त्र अंथरून चौरंग किंवा पाट मांडावा.
– कलश स्थापना: एका कलशात पाणी घेऊन त्यात नाणे, सुपारी आणि हळद-कुंकू घालावे. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवून त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवावा. चौरंगावर कलशाखाली तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर हा कलश स्थापित करावा.
– देवीची स्थापना: कलशाच्या पुढे किंवा बाजूला माता लक्ष्मीची मूर्ती (Murti) किंवा प्रतिमा स्थापित करावी. चौरंगाभोवती आणि समोर सुंदर रांगोळी काढावी.
– पूजन: कलशावर हळद-कुंकू आणि अक्षता वाहाव्या. वस्त्रमाळ (कापसाची) घालून फुलांनी सजावट करावी. देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुले, अत्तर, वस्त्रासाठी कापूस अर्पण करावा. विड्याच्या पानांवर सुपारी आणि दक्षिणा ठेवून अर्पण करावी.
– दीप प्रज्वलन : तुपाचे किंवा तेलाचे निरांजन (दीप) प्रज्वलित करावे.
– कथा वाचन: 'मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा' अवश्य वाचावी किंवा श्रवण करावी. कथेचे वाचन केल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे.
– नैवेद्य व आरती: पुरणपोळी, शिरा, फळे आणि लाह्या-फुटाणे यांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर माता लक्ष्मीची आरती करून सहकुटुंब प्रसाद ग्रहण करावा.

हेही वाचा – Margshirsh Guruwar 2025: या मार्गशीर्षात काय करावं, काय टाळावं? आणि कोणत्या दानाला खास महत्व? जाणून घ्या

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आणि ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही किंवा दावा करत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number