Kidney Stone Surgery: उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या क्लिनिकमध्ये केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोठी परिसरातील दफरापूर माजरा सैदानपूर गावातील मुनिष्रा रावत यांचे किडनी स्टोन काढण्याचे ऑपरेशन यूट्यूब व्हिडिओ पाहून केले गेले, असा गंभीर आरोप महिलेच्या पतीने केला आहे.
ऑपरेशननंतर काही तासांतच मृत्यू
5 डिसेंबर रोजी मुनिष्रा रावत यांना पोटात दुखत असल्याने पती तेह बहादूर रावत यांनी त्यांना कोठीतील “श्री दामोदर दवाखाना” येथे दाखल केले. क्लिनिकचे संचालक ज्ञानप्रकाश मिश्रा यांनी त्यांना किडनी स्टोन असल्याचे सांगत शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. यासाठी 25 हजार रुपये खर्च सांगण्यात आला, त्यापैकी 20 हजार रुपये आधीच घेण्यात आले. तक्रारीनुसार, ऑपरेशनदरम्यान नशेत असलेल्या ज्ञानप्रकाश मिश्रा यांनी यूट्यूबवरील व्हिडिओ पाहत महिलेच्या पोटावर खोलवर चीरे मारले आणि अनेक शिरा कापल्या. त्यामुळे गंभीर त्रास झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला.
हेही वाचा – Mumbai Crime: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलाने 'ती' गोळी खाल्ली अन् 5 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको ते कृत्य केलं
काका-पुतण्या जोडीवर बेकायदेशीर क्लिनिक चालवण्याचा आरोप
मुनिष्राचे पती यांनी असा आरोपही केला आहे की, मिश्रा यांचा पुतण्या विवेक कुमार मिश्रा हा रायबरेली येथील आयुर्वेदिक रुग्णालयात सरकारी नोकरीत असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नावाखाली बेकायदेशीर दवाखाना चालवत आहे.
हेही वाचा – 'न्याय नव्हे, विश्वासघात!'; पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याशी आईनेच बांधली लग्नगाठ
पोलीस आणि आरोग्य विभागाची कारवाई
घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सामुदायिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षकांनी दवाखाना सील केला असून नोटीसही बजावली आहे. दोन्ही आरोपी ज्ञानप्रकाश मिश्रा आणि विवेक कुमार मिश्रा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून बेकायदेशीर क्लिनिकवर प्रशासनाकडून अधिक कठोर कारवाईची मागणी होत आहे.