Yashomati Thakur: राज्यात होळीचा सण होऊन गेला तरी मेळघाटातील हजारो मजुरांच्या हाताला मजुरीचे पैसे मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘रोजगार हमी योजने’च्या (रोहयो) 70 टक्के मजुरांचे पैसे अद्याप थकले असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत त्यांनी थेट नागपूरच्या रोजगार हमी योजना आयुक्तांना फोन लावून अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आणि मजुरांचे पैसे तातडीने देण्याची मागणी केली.
“आमदारांचे पगार वेळेवर, मग मजुरांचे का नाही?”
आयुक्तांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर यांनी प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढले. त्यांनी सवाल केला की, “आमदार आणि खासदारांचे पगार दर महिन्याच्या 1 तारखेला न चुकता खात्यात जमा होतात, मग 100 दिवस घाम गाळणाऱ्या मजुरांच्या मजुरीसाठी टाळाटाळ का?” मेळघाटातील 70 टक्के लोकांच्या खात्यात अद्याप मजुरीचे पैसे जमा झाले नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सणासुदीच्या काळात मजुरांवर उपासमारीची वेळ
होळी हा मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मात्र, मजुरीचे पैसेच मिळाले नसल्याने हे मजूर सण साजरा करू शकले नाहीत, असंही यावेळी यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. “मजुरांकडे सध्या सण साजरा करण्यासाठी पैसे नाहीत. त्यांच्या हक्काचे पैसे अडवून ठेवणे अन्यायकारक आहे,” असे म्हणत त्यांनी आयुक्तांना मजुरांच्या व्यथा ऐकवल्या. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे दुर्गम भागातील मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.
तात्काळ पैसे देण्याची मागणी
मेळघाटातील 70 टक्के मजुरांची थकलेली मजुरी तात्काळ द्यावी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला. मजुरांच्या मजुरीचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. आता आयुक्तांना खडेबोल ऐकवल्यानंतर प्रशासन किती वेगाने हालचाली करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.