Mallikarjun Kharge, Priyank Kharge Land Scam : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर उज्जैन येथील 253 एकर जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप काँग्रेसने केल्यानंतर, आता प्रत्युत्तरादाखल भारतीय जनता पक्षाने (BJP) थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाच लक्ष्य केले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी बुधवारी दिल्लीत एक धडाकेबाज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांच्यावर कर्नाटकमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. खर्गे पिता-पुत्रांनी राजकीय दबावाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून गरिबांची हक्काची जमीन हडपल्याचा दावा भाजपने केला असून या प्रकरणी देशभरात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
'सिद्धार्थ विहार ट्रस्ट'च्या माध्यमातून गैरव्यवहार?
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी केलेल्या दाव्यानुसार, खर्गे कुटुंबाचे पूर्ण नियंत्रण असलेल्या 'सिद्धार्थ विहार ट्रस्ट'च्या नावाखाली हा संपूर्ण कथित भ्रष्टाचार सुरू आहे. मल्लिकार्जुन खर्गे, त्यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य या ट्रस्टचे मुख्य पदाधिकारी आहेत. या कौटुंबिक ट्रस्टच्या विरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचा दावा भंडारी यांनी केला आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या काळातच, म्हणजेच 2024 मध्ये, कर्नाटक सरकारच्या औद्योगिक विकास मंडळाने या ट्रस्टला नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधी रुपयांची जमीन बहाल केल्याचा गंभीर संशय भाजपने व्यक्त केला आहे.
संशोधनाची जमीन लाटल्याचा दावा
या कथित घोटाळ्यातील सर्वात मोठा आक्षेप म्हणजे, हवाई (Aerospace) आणि संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन आणि विकास (R&D) कार्यक्रम राबवण्यासाठी राखून ठेवलेली 5 एकर जमीन या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात आली. वास्तविक पाहता, ही 5 एकर जागा एखाद्या नामांकित औद्योगिक किंवा हवाई क्षेत्रातील संशोधन संस्थेला देणे कायद्यानुसार बंधनकारक होते. या मोक्याच्या जमिनीचा सध्याचा बाजारभाव तब्बल 100 कोटी रुपये इतका आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, ट्रस्टने स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या या मौल्यवान भूखंडावर सध्या कोणत्याही प्रकारचा संशोधन किंवा विकासाचा उपक्रम राबवला जात नसल्याचेही प्रदीप भंडारी यांनी स्पष्ट केले आहे.
राजकीय दबावातून गरिबांच्या जमिनी हडपल्या
प्रियांक खर्गे सध्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळात वजनदार मंत्री असल्याने आणि त्यांचे वडील काँग्रेसचे सर्वोच्च नेते असल्याने या पदांचा गैरवापर करून ही जमीन लाटण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. केवळ हा एकच नव्हे, तर खर्गे कुटुंबाच्या भ्रष्टाचाराचे अनेक कच्चे दुवे लवकरच जनतेसमोर आणणार असल्याचे भंडारी यांनी म्हटले आहे. राजकीय ताकदीच्या बळावर गरिबांच्या जमिनी हिरावून घेणाऱ्या या ट्रस्टच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, काँग्रेसकडून या संपूर्ण आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या वादामुळे कर्नाटकसह राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – Warehouse Collapse: मोठी बातमी! बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली 40 हून अधिक मजूर…