Delhi CJP Protest : दिल्लीमध्ये सीजेपीच्या (CJP) नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून निदर्शकांवर अमानुष बळवापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी अत्यंत निष्ठुरपणे लाठीमार केला आणि त्यांना रोखण्यासाठी पॅलेट गन्सचाही वापर केला," असा दावा त्यांनी केला. या पोलिसी बडग्याला सामोरे गेलेल्या जखमी तरुण-तरुणींना राहुल गांधी यांनी थेट माध्यमांसमोर आणून त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
महिला आंदोलकाचा पुरुष अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या मुस्कान शर्मा या तरुणीने स्वतःवर झालेल्या लाठीचाराचा थरारक अनुभव सांगितला. जंतर-मंतर परिसरात शांततेने चालत असताना आरएएफ (RAF) अधिकाऱ्यांनी आपल्यावर विनाकारण लाठीमार केल्याचे तिने सांगितले. नियम डावलून एका पुरुष अधिकाऱ्याने आपल्या गुप्तांगावर लाठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला. "नियमानुसार महिला आंदोलकांवर पुरुष अधिकारी असा बळवापर करू शकत नाहीत. ज्या वरिष्ठांच्या आदेशावरून हे कृत्य घडले, त्यांनी जाहीर माफी मागावी," अशी मागणी तिने केली.
हेही वाचा – Bypoll Election: पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; नेमकं काय घडलं?
नावावरून भेदभाव आणि द्वेष पसरवल्याची खंत
आपल्या आडनावाचा आणि नावाचा संदर्भ देत मुस्कानने देशातील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. "माझे नाव मुस्कान असल्याने अनेकदा मला मुस्लिम समजून लक्ष्य केले जाते आणि शिवीगाळ केली जाते. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्याला मुस्लिम ठरवून देशद्रोही भासवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे," असा आरोप तिने केला. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून केंद्र सरकारच्या आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.