Akal Takht Decision: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या राजकीय आणि सामाजिक अडचणींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शीख धर्मीयांची सर्वोच्च धार्मिक संस्था असलेल्या अकाल तख्तने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विरोधात अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. अकाल तख्तने मान यांना थेट 'गुरु-द्रोही' (गुरूंची प्रतारणा करणारे) आणि 'पंथ-विरोधी' घोषित केले आहे. यासोबतच, संपूर्ण शीख समुदायाला मुख्यमंत्र्यांसोबत सर्व प्रकारचे संबंध तातडीने तोडण्याचे कडक निर्देश जारी केले आहेत.
वादग्रस्त व्हिडिओ आणि फॉरेन्सिक तपासणीत मुख्यमंत्र्यांचे दावे खोटे
शीख भाविकांबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांमुळे अकाल तख्तने भगवंत मान यांना स्पष्टीकरणासाठी बोलावले होते. त्यानुसार ते 15 जानेवारी रोजी अकाल तख्तसमोर हजरही झाले होते. या सुनावणी दरम्यान, तख्तने 'आप' (AAP) नेत्याकडे एका विशिष्ट व्हिडिओबाबत जाब विचारला होता. या व्हिडिओमध्ये भगवंत मान यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी एक व्यक्ती शीख गुरूंच्या पवित्र छायाचित्रांवर मद्य शिंपडताना दिसत होती. त्यावेळी मुख्यमंत्री मान यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले होते आणि हा व्हिडिओ 'एआय' (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेला बनावट (Deepfake) व्हिडिओ असल्याचा दावा केला होता. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालाने मुख्यमंत्र्यांचा हा दावा खोटा पाडला आहे. दोन सरकारी प्रयोगशाळांच्या तपासणीत तो व्हिडिओ 100 टक्के खरा असल्याचे सिद्ध झाले आहे.
उच्च धर्मगुरूंचा ऐतिहासिक निर्णय
सोमवारी पाच 'सिंग साहिबान' (शीख धर्माचे उच्च धर्मगुरू) यांच्या झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर अकाल तख्तचे जत्थेदार कुलदीप सिंग गरगज यांनी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. जत्थेदार म्हणाले, "आम्ही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्यासाठी तब्बल 6 महिन्यांची मुदत दिली होती, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर भारत सरकारमान्य 2 प्रयोगशाळांकडून आम्ही या व्हिडिओची तांत्रिक तपासणी करून घेतली, ज्यामध्ये हा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले. मान यांनी सर्वोच्च धार्मिक पिठासमोर खोटे बोलून गुरूंचा अनादर केला आहे, त्यामुळे 'पंथ' त्यांच्याशी आता कोणताही संबंध ठेवणार नाही."
पंजाबच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला अकाल तख्तचे समन्स
पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. अकाल तख्तने केवळ मुख्यमंत्र्यांवरच कारवाई केली नाही, तर पंजाब मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांना आगामी 29 June रोजी तख्तसमोर हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे. पंजाब सरकारने शीख संस्था किंवा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) यांच्याशी कोणतीही चर्चा न करता 'जगत जोत श्री गुरु ग्रंथ साहिब सत्कार (सुधारणा) विधेयक, 2026' विधानसभा आणि राज्यपालांच्या मंजुरीने संमत केले होते. या कायद्यामुळे शीख समाजात फूट पडू शकते, असा तख्तचा आक्षेप आहे. "शीख पंथाशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार सरकारला नाही," असे जत्थेदार गर्गज यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Telegram App Ban: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टेलिग्राम ॲपवर बंदी, दिली महत्त्वाची माहिती
काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी
अकाल तख्तच्या या निर्णयानंतर पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटले आहे की, सर्वोच्च धार्मिक संस्थेने इतका गंभीर निर्णय दिल्यानंतर भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. शीख बांधवांच्या भावनांचा आदर ठेवून मान यांनी त्वरित आपल्या पदाचा त्याग करावा.