Congress Leader Joins BJP: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे खंदे समर्थक, माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राहुल बोंद्रे हे येत्या 22 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर बोंद्रे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विदर्भात काँग्रेसला मोठा राजकीय फटका बसल्याचे मानले जात आहे.
25 वर्षांच्या राजकीय प्रवासाला नवी दिशा
राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करत आपल्या या राजकीय भूमिकेची अधिकृत घोषणा केली. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ सहकार, शिक्षण, बँकिंग आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून चिखली मतदारसंघातील जनतेशी सातत्यपूर्ण नाळ जोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणाकडे वैयक्तिक स्वार्थ किंवा व्यवसायाचे साधन म्हणून न पाहता केवळ जनसेवेचे माध्यम म्हणून पाहिले, असे मत त्यांनी व्यक्त केले. चिखलीच्या नागरिकांनी जात, धर्म आणि पक्षाच्या भिंती बाजूला ठेवून आपल्याला दोन वेळा आमदार आणि नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले, या विश्वासाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
हेही वाचा – Baramati Politics: सोमेश्वर कारखान्याच्या अहवालातून पार्थ पवारांचा फोटो गायब; वार्षिक सभेत गोंधळाची शक्यता
कार्यकर्त्यांचे भवितव्य अन् मतदारसंघाच्या विकासासाठी कठोर पाऊल
पक्षांतर करण्याचा निर्णय अत्यंत कठीण आणि भावनिक असल्याचे सांगताना बोंद्रे म्हणाले की, राजकीय आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात जिथे जुन्या आठवणी आणि नाती बाजूला ठेवून भविष्याचा विचार करावा लागतो. हा निर्णय कोणत्याही पदासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून, आपल्यासोबत रात्रंदिवस संघर्ष करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि चिखली परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे चिखलीतील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.