Maithili Thakur in Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर सध्या शिगेला पोहोचला असून, राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटी आणि स्टार प्रचारकांची मोठी फौज मैदानात उतरवण्यात आली आहे. याच प्रचाराच्या रणधुमाळीत प्रसिद्ध लोकप्रिय गायिका आणि भाजपच्या युवा नेत्या मैथिली ठाकूर यांनी मुंबईत हजेरी लावली. दहिसर येथील गणपत पाटील नगर परिसरात प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवाराच्या समर्थनार्थ त्यांनी एका भव्य रॅलीत सहभाग घेतला. यावेळी मैथिली यांच्या झलक पाहण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.
भाषिक वादावर मैथिलीचे मार्मिक उत्तर
मुंबईच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या ‘मराठी विरुद्ध अमराठी’ या भाषिक वादावर मैथिली ठाकूर यांनी अत्यंत सकारात्मक आणि प्रभावी भूमिका मांडली. जेव्हा त्यांना या वादाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी शुद्ध मराठीत उत्तर देत सर्वांची मने जिंकली. “अरे भाऊ, तुम्ही असे का बोलता? मी ‘उत्तर भारतीय मराठी’ आहे,” असे म्हणत त्यांनी प्रादेशिक भिंती तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या विधानाने भाषिक राजकारण करणाऱ्यांना एक प्रकारे आरसा दाखवला असून, मुंबईची सर्वसमावेशक संस्कृती त्यांनी अधोरेखित केली.
विकास आणि एकतेचा मंत्र
मैथिली ठाकूर यांनी केवळ गायनातच नाही, तर आपल्या राजकीय विचारातही प्रगल्भता दाखवली. “आपल्याला लोकांना जोडून विकासाच्या मार्गावर चालायचे आहे. कोणत्याही अडथळ्याविना पुढे जाणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी रॅली दरम्यान स्पष्ट केले. राज्यनिहाय किंवा भाषेनुसार आपण जर विभागले गेलो, तर विकासाची कामे खुंटतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास मुंबईचा अधिक वेगाने विकास होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई माझे दुसरे घर आणि प्रवासाचा अनुभव
उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या नागरिकांचा आणि मराठी माणसांचा विकास हा एकच असल्याचे मैथिली यांनी नमूद केले. मुंबईबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, “मुंबई हे माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखे आहे. मी इथे वारंवार येत असते, त्यामुळे इथल्या लोकांशी माझे एक वेगळे नाते तयार झाले आहे.” बिहार विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपला प्रभाव दाखवला असून, आता मुंबईच्या राजकीय मैदानात त्यांची उपस्थिती विशेष चर्चेत आहे.
मुंबई महानगर पालिका चुनाव २०२६ के प्रचार के लिए वार्ड क्रमांक 1 दहिसर गणपत पाटिल नगर महायूती शिवसेना की उम्मीदवार श्रीमती रेखा राम यादव जी के समर्थन में भव्य चुनाव प्रचार में भाग लिया ? @BJP4India @BJP4Maharashtra @PMOIndia @CMOMaharashtra @TawdeVinod pic.twitter.com/ATLF6E9d3j — Maithili Thakur (@maithilithakur) January 11, 2026
निवडणुकीच्या तोंडावर ‘स्टार’ ग्लॅमर
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान होणार असून, त्यापूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मैथिली ठाकूर यांच्यासारख्या तरुण आणि लोकप्रिय कलाकाराला प्रचारात उतरवून भाजपने उत्तर भारतीय मतदारांसोबतच मराठी तरुणांनाही साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता या स्टार प्रचारकांचा प्रभाव मतपेटीतून किती दिसून येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 1 नंबरच्या प्रभागातून सुरू झालेला हा प्रचार संपूर्ण मुंबईत चर्चेचा विषय ठरला आहे.