Aniket Tatkare MLC Nomination: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा कायम ठेवत युवक नेते अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत.
पक्ष बैठकीनंतर उमेदवारीची घोषणा
रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कोकण विभागातील अनेक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर अनिकेत तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
आदिती तटकरे यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी रवाना
उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अनिकेत तटकरे हे राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. भाऊ-बहिण एकाच वाहनातून रवाना झाल्याने या उमेदवारीला तटकरे कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे दिसून आले. महायुतीतील चर्चेनंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचेही जवळपास निश्चित मानले जात आहे.
शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची घेतली भेट
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनिकेत तटकरे यांनी शिवसेना प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशीही चर्चा केली. या भेटींनंतर त्यांच्या उमेदवारीबाबतची शक्यता अधिक बळकट झाली होती. दरम्यान, या मतदारसंघासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत त्या अर्ज मागे घेणार की निवडणुकीच्या मैदानात कायम राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजीव साबळे यांची नाराजी चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुतारवाडी येथील बैठकीत एक वेगळीच बाब चर्चेचा विषय ठरली. विधान परिषदेसाठी इच्छुक असलेले पक्षाचे प्रवक्ते राजीव साबळे बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यांच्या समर्थकांसह काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. राजीव साबळे हे या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र पक्षाने त्यांच्या दाव्याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्याने ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. बैठकीला गैरहजर राहिल्याने ही नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याचे मानले जात आहे.
कोकणातील निवडणुकीकडे लक्ष
दरम्यान, 18 जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील जागावाटपानंतर आता उमेदवारांच्या अंतिम यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीमुळे कोकणातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.