BMC Election 2026 Survey: मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा (BMC Election 2026) बिगुल वाजला असून, प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या ऐतिहासिक लढाईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र लढत असतानाच, एका ताज्या निवडणूक पूर्व चाचणीने (Survey) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'AsceIndia' या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत यंदा अमराठी मतदारांचा कौल सत्तेची समीकरणे बदलणारा ठरू शकतो.
मराठी मतांची विभागणी आणि ठाकरेंचे वर्चस्व
मुंबईच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला 'मराठी माणूस' यंदा कोणाच्या पाठीशी उभा राहणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सर्व्हेनुसार, मुंबईतील जवळपास 44 टक्के मराठी मतदार ठाकरे गट आणि मनसे युतीच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहे. मात्र, याच वेळी भाजप आणि शिंदे गटानेही मराठी मतांमध्ये मोठी शिरकाव केला असून, त्यांना 42 टक्के मराठी मते मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे मराठी मतांमध्ये होणारी ही चुरस ठाकरे बंधूंच्या चिंतेत भर टाकणारी ठरू शकते.
अमराठी आणि मुस्लीम मतदारांची गणिते
या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अमराठी मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचा परिणाम आकडेवारीतून स्पष्ट दिसत आहे:
अमराठी मते: तब्बल 53 टक्के अमराठी मतदार महायुतीला (भाजप-शिंदे गट) पसंती देताना दिसत आहेत, तर ठाकरे-मनसे आघाडीला केवळ 15 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
मुस्लीम मते: अल्पसंख्याक समाजाचा सर्वाधिक कल काँग्रेसकडे (41 टक्के) असून, ठाकरे-मनसे युतीला 28 टक्के मुस्लीम मते मिळण्याचा अंदाज आहे.
सत्तेच्या चाव्या कुणाकडे?
अमिताभ तिवारी यांच्या नेतृत्वाखालील या सर्व्हेनुसार, जरी मराठी मतांमध्ये ठाकरे बंधूंचे पारडे किंचित जड असले, तरी अमराठी मतांच्या मोठ्या ध्रुवीकरणामुळे मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे गटाचा महापौर बसण्याची दाट शक्यता आहे. 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही मतदानाची टक्केवारी 55 टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज असून, ही निवडणूक ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरण्याची शक्यता आहे.