Mahavitaran Load Shedding : राज्यात यंदा उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून कडक उष्णतेमुळे शिवारातील उभी पिके करपू लागली आहेत. अशा भीषण परिस्थितीत पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची पाण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. दिवस-रात्र शेतात राबून पिकांना पाणी देण्याची कसरत बळीराजा करत असतानाच आता महावितरणने (Msedcl) घेतलेल्या एका तडकाफडकी निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. महावितरणने शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या थ्री-फेज वीजपुरवठ्यात थेट 2 तासांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
रात्रीची लाईट बंद; कडक उन्हात सिंचन करण्याचे संकट
महावितरणच्या नव्या नियमांनुसार, यापूर्वी शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी मिळणारी सलग 8 तास वीज आता कमी करण्यात आली असून ती फक्त 6 तास दिली जाणार आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, हा सुधारित वीजपुरवठा प्रामुख्याने केवळ दिवसाच्या स्लॉटमध्ये दिला जाणार आहे. वास्तविक पाहता, रात्रीच्या वेळी पिकांना दिलेले पाणी उन्हाअभावी जमिनीत जास्त काळ टिकून राहते आणि ते पिकांसाठी अधिक प्रभावी ठरते. मात्र, आता रात्रीचा पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा कडक उन्हात शेतात राबून सिंचन करावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना उष्माघाताचाही सामना करावा लागू शकतो आणि पिकांचे नुकसान वाढण्याचीही भीती आहे.
शिवारात पाण्याची टंचाई आणि महावितरणचा निर्णय
जमिनीला पडल्या भेगा: गेल्या काही महिन्यांपासून तापमान 40 अंशाच्या आसपास किंवा त्याहून अधिक राहिल्याने विहिरी, कूपनलिका आणि नद्यांमधील जलसाठे झपाट्याने आटले आहेत. पाण्याचा फेर थेट 15 ते 20 दिवसांवर गेल्याने उभी पिके सुकू लागली आहेत.
नुकसानीची भीती: ऊस, भाजीपाला, फळबागा आणि खरिपाच्या पूर्वतयारीला या कपातीचा मोठा फटका बसणार आहे. दिवसा दिलेले पाणी तीव्र उन्हामुळे लगेच आटून जाते, ज्यामुळे जमिनीला मोठ्या भेगा पडत आहेत.
शेतकऱ्यांचे सवाल: अवघ्या 6 तासांच्या मर्यादित वीजपुरवठ्यात संपूर्ण शेताला पाणी कसे द्यायचे आणि पिके कशी वाचवायची, असा आर्त सवाल हवालदिल झालेला शेतकरी वर्ग उपस्थित करत आहे.
राज्यात 3,000 मेगावॉट विजेचा मोठा तुटवडा
महावितरणने अचानक घेतलेल्या या जाचक निर्णयामागे राज्यातील विजेचे कोलमडलेले गणित कारणीभूत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड असमतोल निर्माण झाला आहे. राज्यातील महत्त्वाचे 4 वीजनिर्मिती संच अचानक तांत्रिक कारणांमुळे बंद पडल्याने राज्यात तब्बल 3,000 मेगावॉट विजेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या मोठ्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागात अतिरिक्त भारनियमन करावे लागत असून त्याचा पहिला थेट फटका शेती क्षेत्राला बसला आहे. या वीज कपातीविरोधात आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून वीजपुरवठा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.