Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला असून गोकुळ गीते हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान, बंडखोर खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. पक्षप्रवेशापूर्वी या बंडखोर खासदारांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असून 6 बंडखोर खासदार थोड्याच वेळात अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
ठाकरे गटाच्या शिवालयातील बैठकीत तणाव; 4 आमदारांची दांडी
दुसरीकडे, खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची शिवालयामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली होती, जी आता संपली आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण बैठकीत ठाकरे गटाचे 4 आमदार गैरहजर राहिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गैरहजर राहिलेल्या आमदारांनी वेगवेगळ्या प्रकारची कारणे दिली असली, तरी शिवालयातील वातावरण सध्या अत्यंत सुतकी आणि चिंताजनक असल्याचे पाहायला मिळत आहे. या बैठकीबाबत आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रातील एक अत्यंत आश्वासक चेहरा असून त्यांचे नेतृत्व सर्वांनाच मान्य आहे, म्हणूनच विविध पक्षांतील लोकांची त्यांच्याकडे इनकमिंग सुरू आहे.
खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप आणि 7 व्या खासदाराचे गूढ
या संपूर्ण राजकीय घडामोडींवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निधी वाटपावरून सातत्याने त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीपर्यंत चांगला असणाऱ्या व्यक्तीची अचानक बदनामी सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावर बोलताना मनीषा कायंदे यांनी टोला लगावला की, ठाकरे गटाकडून केवळ पक्षात उमटणारी कुणकुण ऐकून लोकांना आधीच गेट आऊट म्हटले जाते किंवा त्यांच्यावर शिवीगाळ केली जाते. सध्या 7 खासदारांची नावे तर समोर आली आहेत, मात्र 7 वा खासदार कोण असणार याचे गूढ अद्याप कायम आहे. याशिवाय, अनेक माजी आमदारांनंतर आता आजी आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.