Snowfall in Kedarnath: उत्तराखंडच्या हिमालयीन पट्ट्यात सध्या जोरदार हिमवृष्टी होत असून, सुप्रसिद्ध केदारनाथ धाम पूर्णपणे पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या चादरीने वेढले गेले आहे. सोशल मीडियावर केदारनाथ मंदिराचा एक विलोभनीय व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात संपूर्ण मंदिर परिसर 3 ते 5 फूट बर्फाच्या थराखाली दबलेला दिसत आहे. कडाक्याची थंडी आणि प्रतिकूल हवामान असूनही, चार धाम यात्रेच्या तयारीसाठी प्रशासन आणि सुरक्षा दले युद्धपातळीवर काम करत आहेत.
22 एप्रिलला उघडणार केदारनाथचे दरवाजे
भाविकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे केदारनाथ मंदिराचे दरवाजे बरोबर एका महिन्यानंतर, म्हणजेच 22 एप्रिल 2026 रोजी विधीवत उघडले जाणार आहेत. त्यापूर्वी 19 एप्रिल रोजी उखीमठ येथून बाबांची ‘डोली’ (पालखी) प्रस्थान करेल. दुसरीकडे, बद्रीनाथ धामचे दरवाजे 23 एप्रिल रोजी उघडणार आहेत. यात्रेसाठीचे ऑनलाइन बुकिंग आधीच सुरू झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
उणे 17 अंश तापमान आणि जवानांचे शौर्य
केदारनाथमध्ये सध्या निसर्गाचे रौद्र पण सुंदर रूप पाहायला मिळत आहे. येथील तापमान उणे 16 ते 17 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले आहे. अशा गोठवणाऱ्या थंडीतही उत्तराखंड पोलीस आणि भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) चे जवान अहोरात्र तैनात आहेत. मंदिराच्या परिसराची सुरक्षा आणि पावित्र्य राखण्यासाठी हे जवान नियमित गस्त घालत आहेत. रुद्रप्रयाग पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जवान स्वतः बर्फ हटवून रस्ते मोकळे करताना दिसत आहेत.
सफेद बर्फ की चादर में लिपटे बाबा केदार! ❄️✨ केदारनाथ धाम का यह विहंगम नजारा मन को शांति और आनंद से भर देता है। जितनी सुंदर यह छटा है, उतने ही जांबाज हमारे पुलिस और ITBP के जवान हैं जो इस हाड़ कंपा देने वाली ठंड में भी सुरक्षा में तैनात हैं। ?️? pic.twitter.com/j7hBOerdzR — Rudraprayag Police Uttarakhand (@RudraprayagPol) March 22, 2026
3 ते 5 फूट बर्फ हटवण्याचे आव्हान
सततच्या हिमवृष्टीमुळे संपूर्ण केदारनाथ शहर 3 ते 5 फूट जाडीच्या बर्फाखाली गेले आहे. यामुळे यात्रेच्या पूर्वतयारीत काहीसे अडथळे येत असले, तरी एप्रिल महिन्यापर्यंत सर्व मार्ग स्वच्छ होतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सध्या बॅरक्स आणि मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटांवरील बर्फ हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हिमालयातील या आव्हानात्मक परिस्थितीत जवानांच्या जिद्दीला सर्वच स्तरातून सलाम केला जात आहे.