Sunetra Pawar: ‘मराठीला आता पोटापाण्याची भाषा करूया…’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मराठी गौरव दिनानिमित्त आवाहन

मराठीला खऱ्या अर्थाने पोटापाण्याची भाषा करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

Sunetra Pawar: ‘मराठीला आता पोटापाण्याची भाषा करूया…’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मराठी गौरव दिनानिमित्त आवाहन

Sunetra Pawar: “मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन किंवा घरात बोलली जाणारी बोलीभाषा न राहता, ती आता ज्ञान-विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे. मराठीला खऱ्या अर्थाने पोटापाण्याची भाषा करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे,” असे कळकळीचे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. नाशिकच्या पुण्यभूमीत आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

नाशिकमध्ये मराठी भाषेचा भव्य ‘कुंभमेळा’
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या नाशिक नगरीत हे संमेलन होत असल्याचा आनंद व्यक्त करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे, परंतु त्याआधीच आज येथे मराठी भाषेचा एक भव्य वैचारिक कुंभमेळा भरलेला आहे. जगभरातून आलेले लेखक, कवी आणि भाषाप्रेमी या संमेलनामुळे एकत्र आले आहेत.”  

अभिजात दर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञान
मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानताना त्यांनी भाषेच्या भविष्यावर प्रकाश टाकला. “आजच्या डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगातही मराठीचा गोडवा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. परिसंवादांमधून कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मराठीचा वापर आणि शाळांचे सक्षमीकरण यावर होणारी चर्चा ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.

यशवंतराव चव्हाण आणि मराठी अस्मितेचे स्मरण
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बलिदान आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचे सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. “चव्हाण साहेबांनी साहित्य संस्कृती आणि मराठी विश्वकोशाची निर्मिती करून मराठीला जे बळ दिले, तीच परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. शासनाने ग्रंथालयांना वाढीव अनुदान आणि मराठी बांधवांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ची उभारणी करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात नेहमीच भरीव तरतूद केली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – MSCB Scam : राज्यात गाजलेल्या घोटाळा प्रकरणाला पूर्णविराम? अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 जणांना न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नव्या पिढीला मराठीची गोडी लावण्याचा संकल्प
भाषणाचे शेवट करताना त्यांनी मराठी जतन करण्याचा मंत्र दिला. “मराठी भाषा ही मातीशी जोडलेली भाषा आहे. बहिणाबाईंच्या ओव्यांपासून ते कुसुमाग्रजांच्या साहित्यापर्यंतचा हा ठेवा नव्या पिढीच्या मनात रुजवला पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून मराठीला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number