Raj Thackeray: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली. सभागृहामध्ये दीनदयाळ उपाध्याय आणि दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचून दाखवताना त्यांच्याकडून मराठी उच्चारांच्या आणि वाचनाच्या अनेक चुका झाल्या. यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जोरदार प्रहार केला. "ज्या पद्धतीने विधानसभेत मराठी भाषेची धिंड काढण्यात आली आणि भाषेवर बेजबाबदारपणे बुलडोझर फिरवला गेला, त्या प्रवृत्तीचा मनसेकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी नोंदवली.
सोलापूर मनसेचे आंदोलन आणि पुस्तकांची अनोखी भेट
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून सोलापूरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी नार्वेकरांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट पोस्टाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना मराठी शुद्धलेखनाची पुस्तके पाठवून आपला रोष व्यक्त केला. "अध्यक्षांनी लवकरात लवकर मराठी भाषा अवगत करावी, अन्यथा थेट त्यांच्या चेहऱ्यावरच बाराखडी गिरवली जाईल. तसेच, त्यांना गरज भासल्यास आमच्या शिक्षक सेनेचे पदाधिकारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मराठीचे धडे देतील," असा सज्जड दम मनसेने दिला आहे. अध्यक्षांना पाठवलेली ही पुस्तके सामान्य नसून तो महाराष्ट्राचा आणि भाषेचा स्वाभिमान आहे, तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत गहाण ठेवणार नाही, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
हेही वाचा – MLC BJP Strength : विधान परिषदेत भाजपच 'किंग'; बहुमताचा आकडा पार करण्यासाठी मित्रपक्षांचीही गरज उरणार नाही!
राहुल नार्वेकरांकडून दिलगिरी आणि स्पष्टीकरण
दरम्यान, वाढता विरोध आणि चौफेर टीकेनंतर अखेर राहुल नार्वेकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले. सभागृहात शोकप्रस्ताव वाचताना आपल्याकडून अनावधानाने चूक झाल्याची कबुली त्यांनी दिली. "इतर कोणत्याही मराठी माणसाप्रमाणेच माझ्याही मनात मराठी भाषेविषयी नितांत आदर आणि अभिमान आहे. कागदावरील छपाई खूपच अस्पष्ट होती आणि अक्षरांचा आकार (फॉन्ट) अतिशय लहान होता, त्यामुळे वाचताना हा गोंधळ उडाला," असे सांगत नार्वेकर यांनी या प्रकाराबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.