Leander Paes Joins BJP : टेनिसचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेसचा भाजप-प्रवेश! पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी तृणमूलला सोडचिठ्ठी देत नवी इनिंग सुरू

लिएंडर पेस यांचा राजकारणातील हा दुसरा मोठा टप्पा आहे. यापूर्वी 2021 मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Leander Paes Joins BJP : टेनिसचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेसचा भाजप-प्रवेश! पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी तृणमूलला सोडचिठ्ठी देत नवी इनिंग सुरू

Leander Paes Joins BJP Ahead of West Bengal Assembly Elections : भारतीय टेनिस क्षेत्रातील दिग्गज खेळाडू लिएंडर पेस यांनी मंगळवारी (31 मार्च 2026) रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृतपणे प्रवेश केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलकात्यात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी कमळ हाती घेतले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री सुकांत मुजुमदार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पेस यांनी नुकतीच भाजप नेते नितीन नबीन यांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते.

भारत: पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरणे
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून मतदानाची प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिला टप्पा 23 एप्रिल 2026 आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल 2026 रोजी होणार असून, मतमोजणी 4 मे 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत 294 जागांपैकी 288 उमेदवारांची घोषणा केली असून, मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत आणखी 13 नावांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने सर्व 294 जागांसाठी आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. लिएंडर पेस निवडणूक लढवणार की केवळ स्टार प्रचारक म्हणून काम करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पेस यांचा राजकीय प्रवास: तृणमूल ते भाजप
लिएंडर पेस यांचा राजकारणातील हा दुसरा मोठा टप्पा आहे. यापूर्वी 2021 मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी तृणमूलसाठी जोरदार प्रचार केला होता, मात्र त्यांनी स्वतः निवडणूक लढवली नव्हती. आता बंगालमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी पक्षबदल केल्याचे मानले जात आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अफाट लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी भाजपने त्यांना कोलकात्यातून मैदानात उतरवण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का
लिएंडर पेस यांच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम बंगालमधील निवडणुकीत एक वेगळीच रंगत येणार आहे. लिएंडर पेस यापूर्वी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये होते. 2021 मध्ये गोव्यात ममता बॅनर्जी यांनी स्वतः त्यांना टीएमसीमध्ये प्रवेश दिला होता. त्या वेळी ममता बॅनर्जी यांनी पेस यांना ‘लहान भाऊ’ म्हटले होते, तर पेस यांनी ममता बॅनर्जींना ‘खरी चॅम्पियन’ म्हटले होते. मात्र टीएमसीमध्ये प्रवेशानंतर पेस यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली नाही. त्यामुळे ते हळूहळू पक्षापासून दूर गेले. भाजपने अनेक नामवंत चेहऱ्यांना आपल्याकडे खेचून तृणमूलसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा – Thalapathy Vijay Net Worth : एखाद्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही जास्त संपत्ती थालापतीकडे; निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर

खेळाडूंचा राजकारणाकडे वाढता कल आणि भाजपला असा फायदा
लिएंडर पेस हे केवळ टेनिस स्टार नसून ते बंगालचे भूमीपुत्र मानले जातात, त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे शहरी भागातील मतदारांवर मोठा प्रभाव पडू शकतो. लिएंडर पेस यांचा जन्म कोलकाता येथे झाला असून त्यांचे कुटुंब कोलकाता आणि गोवा या दोन्ही राज्यांशी संबंधित आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे. अपर मिडल क्लास मतदारांना आकर्षित करण्याची संधी भाजपकडे आहे. याशिवाय, युवा मतदार आणि क्रीडा प्रेमी मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जाऊ शकतो. आता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे टीएमसीसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. पक्षाने त्यांना अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी, शेवटच्या काही जागांच्या घोषणेमध्ये त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा, भाजप पेस यांना उमेदवारी देणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले काही प्रमुख खेळाडू
रविंद्र जडेजा, राजवर्धन सिंह राठोड, सायना नेहवाल, बबीता फोगाट. कीर्ती आझाद, चेतन चौहान, केदार जाधव, एस. श्रीसंत, कल्याण चौबे, अरिंदम भट्टाचार्य, विजेंद्र सिंह. यापैकी राजवर्धन सिंह राठोड हे भाजपमध्ये प्रवेश करून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले सर्वात मोठे उदाहरण आहे. दरम्यान, क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही राजकारणात हात आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर तो स्वतःहून यापासून दूर झाला.

हेही वाचा – Sonia Gandhi Health Update: सोनिया गांधींच्या प्रकृतीत सुधारणा; अखेर सहा दिवसांनंतर मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number