PMC Election : पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात दशकांपासून चर्चेत असलेले आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्ष आता चक्क लोकशाहीच्या आखाड्यात पाहायला मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 (रविवार पेठ आणि नाना पेठ) मधून हे दोन्ही गट समोरासमोर ठाकले आहेत.
एकेकाळी कौटुंबिक नात्यांनी जोडलेल्या या दोन कुटुंबांमधील वैर आता इतके टोकाचे झाले आहे की, गुन्हेगारीनंतर आता राजकारणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकाच कुटुंबातून आलेल्या पण आता एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या या उमेदवारांमुळे मतदारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा मृत आयुष कोमकर याची आई कल्याणी कोमकर यांनी दिला होता, मात्र तरीही पक्षाने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी बंडखोरीचा मार्ग निवडला आहे.
हेही वाचा – BMC Election 2026 : मुंबईचा महापौर उत्तर भारतीय की मराठी? नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ
अजित पवार गटाची उमेदवारी आणि कोमकर कुटुंबाचे आव्हान
या राजकीय युद्धाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर कुटुंबातील महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. गुंड बंडू आंदेकरची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निर्णयाचा कडाडून विरोध करत कल्याणी कोमकर यांनी अपक्ष (Independent) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कल्याणी कोमकर या आयुष्य कोमकर याच्या आई आहेत, ज्याच्या हत्येचा आरोप आंदेकर टोळीतील सदस्यावर आहे.
रक्तरंजित इतिहास आणि राजकीय संघर्ष
रविवार पेठ आणि नाना पेठ या भागात या दोन कुटुंबांमध्ये वर्चस्ववादाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या आणि त्यानंतर त्यांचा भाचा आयुष्य कोमकर याचे नाव या प्रकरणात येणे, यामुळे या संघर्षाने अत्यंत हिंसक वळण घेतले होते. आता हीच लढाई मतपेटीतून लढली जाणार आहे. स्थानिक विकासकामांपेक्षा दोन्ही गटांमधील हा कौटुंबिक आणि टोळी संघर्ष निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.