Maghi Ganesh Jayanti 2026 : गणपती बाप्पा हे अवघ्या महाराष्ट्राचे आणि हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत. बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता मानल्या जाणाऱ्या गणेशाचा खरा जन्मोत्सव हा माघ शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो. यंदा म्हणजेच 2026 मध्ये हा शुभ दिवस गुरुवार, 22 जानेवारी रोजी येत आहे. गणेश जयंतीला 'विनायक चतुर्थी', 'तिलकुंद चतुर्थी' किंवा 'वरद चतुर्थी' अशा विविध नावांनी ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, याच तिथीला गणपतीचा जन्म झाला होता, ज्यामुळे या दिवसाला 'माघी गणेश जयंती' असे संबोधले जाते.
2026 चा तिथी आणि पूजेचा शुभ मुहूर्त
माघी गणेश जयंतीच्या पूजेसाठी शास्त्रात 'मध्याह्न' वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुरुवार, 22 जानेवारी 2026 रोजी चतुर्थी तिथी पहाटे 02:47 वाजता सुरू होईल आणि शुक्रवारी 23 जानेवारीला पहाटे 02:28 वाजता समाप्त होईल. बाप्पाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 11:29 ते दुपारी 01:37 पर्यंत असेल. या काळात गणेशाची प्राणप्रतिष्ठा किंवा विशेष पूजा-अर्चा करणे अत्यंत फलदायी ठरते. विशेष म्हणजे, या दिवशी चंद्र दर्शन टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण माघी चतुर्थीचे चंद्र दर्शन केल्यास खोटा कलंक लागण्याची शक्यता असते, असे पौराणिक कथांमधून सांगितले जाते.
तिळाच्या लाडवांचा नैवेद्य आणि आरोग्याचा संबंध
भाद्रपदातील गणेशोत्सवात आपण बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवतो, मात्र माघी गणेश जयंतीला 'तिळाच्या लाडवांचे' विशेष महत्त्व असते. जानेवारी महिन्यात येणारी ही चतुर्थी कडाक्याच्या थंडीत येते. विज्ञानाच्या दृष्टीने, तिळ आणि गुळ हे उष्णतावर्धक असून शरीराला ऊर्जा देतात. म्हणूनच या दिवसाला 'तिलकुंद चतुर्थी' असेही म्हणतात. या दिवशी बाप्पाला तिळाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने आरोग्याचे रक्षण होते आणि मनाला शांती मिळते, अशी भावना भाविकांमध्ये असते.
गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील नेमका फरक
अनेकांमध्ये गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी या दोन सणांबाबत संभ्रम असतो. भाद्रपद महिन्यात साजरी होणारी 'गणेश चतुर्थी' ही मुख्यत्वे पार्थिव गणेश पूजन आणि गणपतीचे उपनयन संस्कार (मुंज संस्कार) याच्याशी तसेच, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक उत्सवाशी जोडलेली आहे. तर माघ महिन्यातील 'गणेश जयंती' ही साक्षात गणपतीचा जन्मदिन म्हणून साजरी होते. माघ महिन्यातील या तिथीला गणेश लहरी पृथ्वीवर सहस्त्रपटीने कार्यरत असतात, ज्यामुळे या दिवशी केलेले 'गणेश अथर्वशीर्ष' पठण किंवा 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो. अष्टविनायक आणि कोकणातील मंदिरांमध्ये या दिवशी मोठा उत्सव असतो.
भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची पद्धत अलीकडे सुरू झाली आहे. पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरता मर्यादित होता. आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. मोठ्या सार्वजनिक मिरवणुका नसल्या तरी उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाल्याचे दिसून येत आहे. या सणामुळे लोकांमध्ये येत्या काळात पवित्र भक्तीमय चैतन्य निर्माण होईल. बाप्पाच्या जन्मोत्सवानिमित्त घरोघरी रांगोळ्या, फुलांची सजावट आणि आरत्यांचे स्वर ऐकायला मिळतील. आपल्या आयुष्यातील संकटे दूर करून सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी हा 'विघ्नहर्ता' नेहमीच सज्ज असतो.