Kishori Pednekar slams Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकारांशी बोलताना पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या पक्षांतरावर बोचरी टीका केली. नीलम गोऱ्हे यांचे ‘काळे हृदय’ असून त्यांनी पक्षासाठी शून्य कार्य केले आहे, अशी टीका पेडणेकर यांनी केली. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांच्या संभाव्य नियुक्तीवरही त्यांनी भाष्य केले आहे.
नीलम गोऱ्हे यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय प्रहार
किशोरी पेडणेकर यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना म्हटले की, त्यांनी आपले बुद्धीचातुर्य केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरले, पक्षासाठी त्याचे काहीही योगदान नाही. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते ताटकळत असताना गोऱ्हे अडथळा निर्माण करायच्या, असा आरोपही त्यांनी केला. पेडणेकर यांनी गोऱ्हे यांच्या अहंकाराचा (Ego) एक किस्सा सांगितला, ज्यामध्ये केवळ एका पोलिसाने लक्ष दिले नाही म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून त्या पोलिसाचा अपमान केला होता. जेव्हा त्यांना वाटले की ठाकरेंकडून आता काही मिळणार नाही, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात उडी मारली, असे पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई महानगरपालिकेत ‘महिला राज’ आणि अश्विनी भिडेंची नियुक्ती
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीवर पेडणेकर यांनी सकारात्मक मत व्यक्त केले. अश्विनी भिडे यांनी यापूर्वी अतिरिक्त आयुक्त (AMC) म्हणून काम केले असून त्यांच्या कामाची पद्धत अत्यंत सकारात्मक असल्याचे पेडणेकर यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेत महापौर, विरोधी पक्षनेता आणि आयुक्त ही तिन्ही पदे महिलांकडे असल्याने खऱ्या अर्थाने ‘महिला राज’ पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीला एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा असल्याबद्दल विचारले असता, त्यांच्यातील धुसफूस आता बाहेर येत आहे, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा – Rohit Pawar: “भोंदू खरातला संवपले जाणार?” फेसबुक पोस्टद्वारे प्रश्न विचारात रोहित पवारांनी व्यक्त केली शंका
शिंदे गटातील अस्वस्थता आणि दिल्ली दौरे
किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर आणि गटातील अंतर्गत वादावरही भाष्य केले. दिल्लीश्वरांना आता शिंदे यांचे काम संपले आहे असे वाटू लागले आहे, कारण ज्या उद्देशाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडायची होती, तो पूर्ण झाला आहे. आता दिल्लीच्या नेत्यांना शिंदे गटाची ‘उपद्रव्यता’ संपल्याचे लक्षात आले आहे, असा दावा पेडणेकर यांनी केला. तसेच मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेवरून त्यांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या वागणुकीवर (मारामारी, पैशांच्या बॅगांचे दर्शन) सडकून टीका केली.
राजकीय परिस्थिती: महाराष्ट्र आणि इतर राज्ये
पेडणेकर यांनी दावा केला की, केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर अनेक राज्येही आता भाजपच्या विरोधात उभी राहत आहेत. शिवसेनेला संपवण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी मुंबईमध्ये शिवसेना भक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात सध्या सुरू असलेल्या या संघर्षात जनतेचा कौल कोणाकडे आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सूचित केले.
हेही वाचा – Eknath Khadse: कागदपत्रांत खाडाखोड आणि वतन जमिनीचा पेच; एकनाथ खडसेंनी फेटाळले आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?