Nanded Mayor : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, भारतीय जनता पक्षाच्या कविता संतोष मुळे यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी दिपकसिंह रावत यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, नांदेड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला असून, या विजयामुळे भाजपच्या गोटात मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.
महिला नगरसेविकांमध्ये होती मोठी चुरस
नांदेड महानगरपालिकेचे महापौरपद यंदा ‘सर्वसाधारण (खुला) महिला’ प्रवर्गासाठी राखीव होते. भाजपच्या तिकिटावर 12 महिला उमेदवार निवडून आल्याने पक्षात उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. यामध्ये ज्योती कल्याणकर, अनुराधा काळे, शांभवी साले, वैशाली देशमुख आणि सुदर्शना खोमणे अशा दिग्गज महिला नगरसेविकांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्यांनी नांदेडच्या पहिल्या भाजप महापौर होण्याचा बहुमान मिळवला.
अंतिम क्षणी रंगली चुरस
निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक 2 च्या कविता मुळे आणि प्रभाग क्रमांक 1 च्या ज्योती कल्याणकर यांच्यात अंतिम चुरस पाहायला मिळाली. राजकीय गणिते आणि जातीय समीकरणांचा विचार करता कविता मुळे यांनी आघाडी घेतली. कविता मुळे यांची निवड जाहीर होताच घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
भाजपच्या सत्तेचा नवा अध्याय
काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये भाजपने दिमाखात प्रवेश करत सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. नवनियुक्त महापौर कविता मुळे आणि उपमहापौर दिपकसिंह रावत यांच्यासमोर आता शहराच्या विकासाचे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ‘शहराचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक कारभार हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असेल,’ अशी प्रतिक्रिया निवडीनंतर नवनियुक्त महापौरांनी दिली आहे.