Karuna Sharma refuses to back down from Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणातून काँग्रेसने अखेर आपली उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने घेतलेल्या या निर्णयावर करुणा शर्मा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या काँग्रेसने माघार घेणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, करुणा शर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून, त्या आता थेट निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्र मनमानी पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.
अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी
करुणा शर्मा यांनी निवडणूक लढवण्यामागचे मुख्य कारण स्पष्ट करताना अजित पवारांच्या निधनाच्या मुद्द्याला हात घातला आहे. “अजित दादांच्या मृत्यूच्या संदर्भात रोहित पवार करत असलेल्या मागणीनुसार एफआयआर (FIR) दाखल झाला पाहिजे,” ही त्यांची प्रमुख मागणी होती. जर ही मागणी पूर्ण झाली असती तर आपण माघार घेतली असती, असे त्यांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट असली तरी, दादांना न्याय मिळवून देणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी लोक जर न्याय देऊ शकत नसतील, तर त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडेंना खुलं आव्हान
करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर माघार घेण्याचा विचार केला होता, मात्र धनंजय मुंडे यांच्या एका पोस्टमुळे त्यांनी आपला निर्णय बदलला. “मोठे राजकारणी काँग्रेससारखे पक्ष विकत घेऊ शकतात, पण करुणा मुंडेला विकत घेण्याची कोणाचीही लायकी नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का केला. धनंजय मुंडे यांनी आपल्याला निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते, ते आपण स्वीकारले असून पराभव झाला तरी आपण रणरागिणीसारखे लढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शंभूराजेंना आदर्श मानत असल्याचे सांगितले
आपल्या राजकारणातील आदर्श म्हणून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज (शंभूराजे) यांचा उल्लेख केला. ज्याप्रमाणे शंभूराजेंनी कितीही संकटे आली तरी माघार घेतली नाही, त्याच विचारांवर आपण चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला असला तरी, मजबूत प्रतिस्पर्ध्याशी लढण्यातच खरी मजा असते, असे म्हणत त्यांनी स्वराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून आपली लढत सुरू ठेवली आहे. केवळ 50 मते मिळाली तरी चालतील, पण महापुरुषांचे विचार घेऊन आपण पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.