Kangana Ranaut secret marriage : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतीच कंगना कॅमेऱ्यासमोर आली असता तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील हिरव्या बांगड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कंगनाने गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांना उधाण आले आणि चाहत्यांनी तिच्या मिस्ट्री मॅनचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, आता स्वतः कंगनाने या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देत अफवांना पूर्णविराम दिला आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवरून चाहत्यांचे दूर केले गैरसमज
लग्नाच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर कंगनाला सतत फोन आणि मेसेजद्वारे विचारणा केली जात होती. या सर्व गदारोळावर स्पष्टीकरण देताना कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक विशेष स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मी सध्या माझ्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. एका फोटोग्राफरने माझा हा फोटो क्लिक केला, ज्यामध्ये मी माझ्या पडद्यावरील भूमिकेसाठी विवाहित महिलेच्या लूकमध्ये आणि मेकअपमध्ये बसले होते. अभिनय क्षेत्रात काम करताना अशा वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतात, यात एवढी आश्चर्य वाटण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. मी सर्वांना प्रॉमिस करते की, मी कधीही लपूनछपून किंवा गुपचूप लग्न करणार नाही.
कंगनाचा बॉलिवूडमधील प्रदीर्घ प्रवास आणि फिल्म
कंगना राणौतने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले होते. तिला आता या चंदेरी दुनियेत तब्बल 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या गँगस्टर चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर तिने 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रातही यशस्वी पाऊल ठेवले. त्यानंतर वर्ष 2025 मध्ये आलेल्या बहुचर्चित इमर्जन्सी या चित्रपटात ती शेवटची पडद्यावर दिसली होती.
आगामी प्रोजेक्ट्स आणि राजकीय कारकीर्द
सध्या चित्रपटांसोबतच कंगना खासदार म्हणून राजकीय जबाबदारीही सांभाळत आहे. आगामी काळात ती भारत भाग्य विधाता या मोठ्या राजकीय ड्रामा असलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेता आर माधवन याच्यासोबतही ती एका नव्या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असून, सध्या त्याच चित्रपटाचे काम वेगाने सुरू आहे. या आगामी प्रोजेक्ट्सच्या चित्रीकरणादरम्यानचाच हा लूक असल्याचे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.