Uddhav Thackeray: वर्ष 2009 मधील कल्याण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्भवलेल्या एका जुन्या वादात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष असताना घेतलेल्या एका प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचा एक कथित व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला होता. या व्हिडीओद्वारे आपली बदनामी झाल्याचा आरोप करत डावखरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याच 15 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात आता कल्याण न्यायालयाने ठाकरेंना समन्स जारी केले असून, 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा – Abhijeet Dipke: ‘…अन्यथा आई-वडिलांना मारुन टाकू’,अभिजीत दीपके यांना धमकी आल्याचा कुटुंबीयांचा दावा
डोंबिवलीतील त्या प्रचारसभेत दाखवण्यात आलेला व्हिडीओ पूर्णपणे मॉर्फ केलेला होता आणि आपली प्रतिमा मलीन करण्यासाठीच त्याचा वापर करण्यात आला, असा ठाम दावा वसंत डावखरे यांनी केला होता. दुसरीकडे, शिवसेनेने तो व्हिडीओ खरा असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची भूमिका घेतली होती. या कायदेशीर लढ्यात ठाकरेंसह इतरही काही नेत्यांची नावे समाविष्ट होती.
दरम्यान, या खटल्यातील मुख्य तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झालेले असल्याने, न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय वळण मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 5 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीत उद्धव ठाकरे स्वतः न्यायालयात हजेरी लावतात की वकिलांमार्फत आपली बाजू मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच या प्रकरणात डावखरे कुटुंबाची पुढील भूमिका काय असणार, यावरही या खटल्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.