K Annamalai Resigned BJP: तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे आक्रमक नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे आपला अधिकृत राजीनामा सोपवला आहे. पक्षाचा त्याग केल्यानंतर अण्णामलाई यांनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अण्णामलाई हे भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज असून ते पक्ष सोडणार, अशा अटकळ बांधल्या जात होत्या. विशेष म्हणजे, राजीनामा देण्यापूर्वीच ते स्वतःचा नवीन राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची चर्चा होती. त्यातच आता संपूर्ण तामिळनाडूमध्ये त्यांच्या समर्थनार्थ मोठे पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांना थेट आव्हान; स्वतंत्र वाटचालीचे संकेत
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई विमानतळावर माध्यमांशी बोलताना अण्णामलाई यांनी आगामी दोन दिवसांत आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले होते. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या अण्णामलाई यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे ते भाजपपासून दुरावत गेल्याचे स्पष्ट झाले होते. सीबीएसईने (CBSE) चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीसाठी लागू केलेल्या ‘त्रिभाषा सूत्राला’ त्यांनी जाहीर विरोध केला होता आणि ही अधिसूचना तात्काळ मागे घेण्याची मागणी केली होती. पक्षाच्या मुख्य विचारसरणीच्या विरोधात जाऊन घेतलेल्या या भूमिकेमुळे, अण्णामलाई तळागाळातील जनतेला जोडण्यासाठी स्वतःची नवी राजकीय चूल मांडण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला होता.
K Annamalai meets HM Amit Shah in Delhi amidst speculation on his future in BJP Read @ANI Story I https://t.co/XFTPNI9m1k#Annamalai #AmitShah #Delhi #BJP pic.twitter.com/YRn7y2t6iM — ANI Digital (@ani_digital) June 2, 2026
निवडणूक समीकरणांवरून मतभेद
अण्णामलाई यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान टी.टी.व्ही. दिनकरन आणि माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना भाजपच्या सोबत आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. तेव्हापासूनच त्यांच्यात धुसफूस सुरू होती. आगामी 2026 च्या विधानसभा रणसंग्रामासाठी भाजपने ‘एआयएडीएमके’ (AIADMK) पक्षासोबत युती केल्यानंतर अण्णामलाई यांनी पक्षाच्या उपक्रमांपासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवले होते. तिकीट वाटप, इतर पक्षांशी जागांचे गणित आणि उमेदवारांची निवड या मुद्द्यांवर भाजप हायकमांड आणि अण्णामलाई यांच्यात एकमत न झाल्याने अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा अंतिम निर्णय घेतला.