Jitendra Shelke Accident : समृद्धी महामार्गावर ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघातात झालेला मृत्यू आता राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या अशोक खरातचा हा विश्वासू सहकारी अपघातात ठार झाल्यामुळे, हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते रोहित पवार आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.
“कोणा बड्या व्यक्तीची अडचण टाळण्यासाठी हा कट?” – रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. “भोंदू खरातचे अजून काही कारनामे समोर येऊ नयेत आणि कोणा बड्या व्यक्तीची अडचण होऊ नये, यासाठी तर हा अपघात घडवून आणला नाही ना?” असा सवाल त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करतानाच, खरातच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी बाहेर येण्याची शक्यता असल्याने आता सरकारने खुद्द अशोक खरातच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे पवार यांनी नमूद केले.
शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची… — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 17, 2026
“सत्य बाहेर येऊ नये म्हणून महत्त्वाची कडी कापली!” – सुषमा अंधारे
सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून शासन व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. “खरात प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे जितेंद्र शेळके होते. त्यांचा असा मृत्यू होणे ही बाब अत्यंत संशयास्पद आहे,” असे त्या म्हणाल्या. अनेक नेत्यांनी आधीच खरातच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते, आजच्या घटनेने त्या भीतीला बळकटी मिळाली आहे. ‘एसआयटी’ (SIT) तपासाची गती वाढवत नसल्याने संशयाचे धुकं गडद होत असून, काही लोकांना या प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये असे वाटतेय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खरात प्रकरणातील शिवनीका ट्रस्टचा संचालक शेळके याचा अपघाती मृत्यू धक्कादायक आहे. खरात चा एन्काऊंटर होऊ शकतो ही अनेकांनी व्यक्त केलेली शंका यानिमित्ताने अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. pic.twitter.com/Z78P9TfDr2 — SushmaTai Andhare (@andharesushama) April 17, 2026
नेमकी घटना काय होती?
अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह शिर्डीकडे जात असताना समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात शेळके आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. खरातला अटक झाल्यापासून शेळके तणावाखाली असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या मृत्यूमागे मोठे षड्यंत्र असल्याचा दावा विरोधकांनी केल्याने या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे.