New Governor of Maharashtra: त्रिपुराच्या राजघराण्यातील वारसदार आणि अनुभवी राजकारणी जिष्णू देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली. राजभवनातील ‘लोकभवन’ येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर आता पूर्णवेळ राज्यपालांची नियुक्ती झाली आहे.
दिग्गजांची मांदियाळी आणि शाही स्वागत
या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून नवनियुक्त राज्यपालांचे स्वागत केले. याशिवाय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. तत्पूर्वी, मुंबईत आगमन झाल्यावर त्यांना राज्य पोलिसांतर्फे मानवंदना (Guard of Honour) देऊन सन्मानित करण्यात आले होते.
कलेचा वारसा लाभलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व
जिष्णू देव वर्मा हे केवळ एक अनुभवी राजकारणी नसून, त्यांना कला आणि साहित्याचीही मोठी ओढ आहे. त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्याशी संबंधित असलेले वर्मा हे उत्तम लेखक, कवी आणि शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे शिक्षण कोलकता विद्यापीठातून झाले असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली आहे. राजघराण्याचा वारसा असूनही अत्यंत साधी राहणी आणि सामान्यांशी संवाद साधण्याची वृत्ती ही त्यांची ओळख आहे.
LIVE | महाराष्ट्राचे नवनियुक्त मा. राज्यपाल जिष्णू देव वर्माजी यांचा शपथविधी समारंभ ? संध्या. ४.३२ वा. | १०-३-२०२६?लोकभवन, मुंबई.@maha_governor @Jishnu_Devvarma #Maharashtra #Mumbai #OathCeremony https://t.co/bsdXHrWqwG — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 10, 2026
प्रशासकीय अनुभवाची मोठी शिदोरी
महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच, 2018 ते 2023 या काळात त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. या काळात त्यांनी अर्थ, नियोजन, ग्रामीण विकास आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची खाती यशस्वीपणे हाताळली. प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.