Jayant Patil: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कथित भेटीमुळे जोरदार चर्चा सुरू आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शरद पवार गट यांच्यात संभाव्य विलीनीकरण होणार असल्याच्या अफवांना उधाण आले होते. या सर्व चर्चांवर आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आता स्वतः जयंत पाटील यांनी जाहीर स्पष्टीकरण देत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी पक्षात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता किंवा घालमेल नसल्याचे स्पष्ट केले. कथित भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्या पक्षात कोणतीही घालमेल नाही. तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय त्यांची आणि माझी भेट झालीच नाही, तर मी ‘हो’ कसं म्हणू?” अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवर अधिक भाष्य करणे टाळत त्यांनी स्पष्ट केले की, त्यांना दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर किंवा निर्णयांवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.
जयंत पाटील यांच्या या थेट आणि स्पष्ट भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना आता पूर्णविराम मिळाला असून, पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.