Devendra Fadnavis: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित अपहार आणि निधी चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या कथित घोटाळ्याच्या विरोधात आज मुंबईतील दादर येथे ठाकरे गटाकडून 'रामरक्षा आंदोलन' छेडण्यात आले असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, या आंदोलनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धवजींना अखेर प्रभू श्रीराम आठवले, याचा मला मनापासून आनंद आहे. त्यांनी यापूर्वी रामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची ही अधोगती झाली. त्यांनी केवळ आजच्या दिवसापुरते मर्यादित न राहता रोजच रामरक्षा म्हणावी, जेणेकरून राम मार्गाने चालून त्यांचे काहीतरी भलं होईल."
दादरमध्ये 'अब हिंदू माफ नही करेगा'चा नारा; हनुमान चालिसा पठणाने देणार जाब
दरम्यान, हे आंदोलन आज दुपारी 4:00 वाजता दादर (पश्चिम) येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरासमोर आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी 'अब हिंदू माफ नही करेगा' असा थेट इशारा देणारे मोठे बॅनर्स दादर प्लाझा, कबुतरखाना आणि कलानगर या प्रमुख भागांमध्ये झळकवण्यात आले आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट भाजपला थेट आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
'मातोश्री'वरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
तथापि, या आंदोलनाची घोषणा करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'हिंदू मार नहीं खाएगा' या विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज मी सांगू इच्छितो की, 'अब हिंदू माफ नहीं करेगा'. जे लोक मंदिरातील देवाचा निधी लुटत आहेत, त्यांना देशातील हिंदू त्यांची खरी जागा दाखवून देतील. राम मंदिराच्या दानपेटीतील या चोरीचा जाब विचारण्यासाठीच आम्ही रविवारी दादरच्या मारुती मंदिरात एकत्र येत आहोत. तिथे आम्ही रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करून आंदोलन करू."