Operation Tiger Twist: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या बंडखोरीवरून सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यात आता एक अत्यंत अनपेक्षित वळण आले आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात होते. गेल्या आठवड्यात रविवारी उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीनंतरच या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू झाली होती. त्या बैठकीला प्रत्यक्ष केवळ 4 खासदार उपस्थित होते, तर उर्वरित 5 खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. मात्र, आता हा संपूर्ण गेम उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'त्या' 6 बंडखोर खासदारांच्या नावांची जोरदार चर्चा
पक्षांतराच्या प्राथमिक वृत्तानुसार, ठाकरे गटातून वेगळा गट स्थापन करण्यासाठी 6 खासदारांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई), संजय देशमुख (वाशिम), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) आणि संजय जाधव (परभणी) यांच्या नावांचा प्रामुख्याने समावेश होता. दुसरीकडे, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे 3 खासदार अजूनही 'मातोश्री'शी एकनिष्ठ असल्याचे चित्र होते. हा 6 खासदारांचा संभाव्य गट स्वतंत्र अस्तित्वाच्या तयारीत असल्याच्या बातम्यांमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता पसरली होती.
'आम्ही कुठेही गेलेलो नाही'; खासदारांच्या विधानाने संभ्रम वाढला
या संपूर्ण वादात खरा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा बंडखोरांच्या यादीत नाव असलेल्या दोन महत्त्वाच्या खासदारांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी अचानक एक मोठे विधान करत, "असा कोणताही प्रकार घडलेला नाही आणि आम्ही कोणाकडेही गेलेलो नाही," असे स्पष्ट केले. पाठोपाठ मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनीही अशाच सुरात भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. या दोन खासदारांच्या बचावात्मक पवित्र्यामुळे बंडखोरांचा दोन-तृतीयांश (2/3) बहुमताचा आकडा धोक्यात येऊ शकतो, ज्यामुळे हा डाव अजूनही पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटलेला नाही, असे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा – Ravi Rana On Shivsena UBT Operation Tiger : "ठाकरेंचे 2 खासदार माझ्या संपर्कात" रवी राणा यांचा खळबळजनक दावा
'मातोश्री'वर बैठकांचे सत्र; गुरुवारी अंतिम चित्र स्पष्ट होणार
दरम्यान, खासदारांच्या या पलटीमार विधानांनंतर ठाकरे गटाच्या गोटात हालचालींना कमालीचा वेग आला आहे. पक्ष वाचवण्यासाठी 'मातोश्री' निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांच्या तातडीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. खासदारांची ही विधाने केवळ दबावतंत्राचा भाग आहेत की ते खरोखरच पक्षात थांबणार, याचे संपूर्ण आणि स्पष्ट चित्र आता गुरुवारी होणाऱ्या घडामोडींनंतरच समोर येईल.