Iran War Threat to Undersea Internet Cables : मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाने आता थेट समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबल्सना धोका निर्माण केला आहे. जगातील 99 टक्के इंटरनेट ट्रॅफिक ज्या समुद्राच्या पाण्याखालील फायबर-ऑप्टिक केबल्सवर अवलंबून आहे, त्या सध्या युद्धाच्या छायेत आहेत. विशेषतः भारतासाठी हा मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे, कारण देशाचा मोठा डेटा याच संवेदनशील भागातून युरोपला जातो.
युद्धाची व्याप्ती आणि इन्फ्रास्ट्रक्चरला धोका
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता एक महिना उलटून गेल्यानंतरही शमण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य घुसवण्याची धमकी दिली असून, हे युद्ध आता केवळ जमीन आणि आकाशापुरते मर्यादित राहिलेले नाही. जगातील महत्त्वाच्या इंटरनेट केबल्स स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि लाल समुद्र (Red Sea) सारख्या भागातून जातात, जिथे इराणचे वर्चस्व किंवा प्रभाव आहे. इराणने थेट धमकी दिली नसली तरी, इराण समर्थित हौथी बंडखोरांनी अनेकदा या केबल्स कापण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर धोक्यात आले आहे.
इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर मोठे संकट
भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण भारताचे इंटरनेट जाळे मोठ्या प्रमाणावर या सागरी मार्गांवर अवलंबून आहे आणि याला हौथी बंडखोरांपासून धोका होऊ शकतो. भारताचे सुमारे 60 टक्के इंटरनेट ट्रॅफिक मुंबईतून निघणाऱ्या आणि लाल समुद्रातून युरोपला जाणाऱ्या समुद्री केबल्सवर अवलंबून आहे. भारतातील इंटरनेटचे प्रमुख मार्ग मुंबई ते युरोप आणि उर्वरित ट्रॅफिक चेन्नई ते सिंगापूर आणि प्रशांत महासागरातून जातो. पश्चिम आशियातील तणावामुळे भारताच्या मुख्य इंटरनेट लाईनला 'जिओपॉलिटिकल' जोखीम निर्माण झाली आहे. जर या केबल्सना हानी पोहोचली, तर इंटरनेट पूर्णपणे बंद होणार नाही. मात्र, डेटा ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने वळवल्यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग (Speed) कमालीचा मंदावू शकतो.
हेही वाचा – Strait of Hormuz: होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावावर आखाती देशांचा तोडगा; आता चमकणार अदानींचं नशीब
लाल समुद्र (Red Sea): जागतिक डेटाचा मुख्य महामार्ग
लाल समुद्र हा जागतिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा कणा मानला जातो. या भागातील भौगोलिक स्थिती सध्या अत्यंत स्फोटक आहे.
– 17 अंडरसी केबल्स: लाल समुद्राच्या तळाशी सुमारे 17 महत्त्वाच्या अंडरसी केबल्स आहेत.
– केबलची रचना: या केबल्समध्ये फायबर ऑप्टिक कोअर, कॉपर वायरिंग आणि संरक्षक स्तर असतात, ज्यातून दर सेकंदाला प्रचंड डेटा ट्रान्सफर होतो.
– ITU चा अहवाल: इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) नुसार, जागतिक इंटरनेट ट्रॅफिकचा 99% हिस्सा याच मार्गावरून वाहतो.
लष्करी कारवाई आणि जागतिक चिंता
अमेरिकेने या भागात आपले लष्करी सामर्थ्य वाढवले असून, कोणत्याही सायबर किंवा फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवरील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमुळे युद्धाचा शेवट जवळ आल्याचे वाटत असले, तरी समुद्राच्या तळाशी असलेल्या मालमत्तेचे संरक्षण करणे हे जागतिक समुदायासाठी मोठे आव्हान ठरत आहे. जर या केबल्सचे नुकसान झाले, तर केवळ भारतच नाही, तर युरोप आणि आशियातील अनेक देशांची बँकिंग, दळणवळण आणि आपत्कालीन सेवा विस्कळीत होऊ शकतात.
हेही वाचा – India Oil Supply : होर्मुज नाही तर नाही; भारतासाठी हा नवा मार्ग ठरणार लाइफलाईन, पण..