Iran Proposes 1 Dollar per Barrel Toll : इराण आणि अमेरिका यांच्यातील दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल असे वाटत असतानाच, इराणने एक नवीन आर्थिक आणि सामरिक खेळी खेळली आहे. याला अमेरिका आणि इस्रायलकडून केल्या जात असलेल्या विविध वक्तव्यांची आणि कृतींचीही किनार आहे. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'वर (Strait of Hormuz) आपली पकड घट्ट करत इराणने आता या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर 'टोल' आकारण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, हा कर प्रति बॅरल 1 डॉलर इतका असेल आणि त्याची वसुली क्रिप्टोकरन्सीमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. इराणच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये टोलची मागणी
इराणच्या तेल, गॅस आणि पेट्रोकेमिकल एक्सपोर्टर्सचे प्रवक्ते हमिद हुसैनी यांनी या नवीन प्रक्रियेबद्दल माहिती दिली. इराणच्या नव्या नियमानुसार, या सामुद्रधुनीतून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रत्येक जहाजाला त्यांच्याकडील कार्गोची सविस्तर माहिती ईमेलद्वारे प्रशासनाला द्यावी लागेल. त्यानंतर इराणकडून संबंधित शिपिंग कंपनीला डिजिटल करन्सीमध्ये किती शुल्क भरायचे आहे, हे कळवले जाईल. तेलाच्या प्रत्येक बॅरलमागे 1 डॉलर टोल आकारला जाईल, मात्र रिकामी जहाजे कोणत्याही शुल्काशिवाय या मार्गावरून जाऊ शकतील, असे हुसैनी यांनी स्पष्ट केले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद
इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहवर केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने आक्रमक पाऊल उचलत होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे. अमेरिकेसोबतच्या करारानुसार हा मार्ग तात्पुरता खुला करण्याची तयारी इराणने दर्शवली होती, मात्र बदलत्या परिस्थितीमुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. इराणच्या 'रिव्हॉल्युशनरी गार्ड कोर्प्स'ने (IRGC) सागरी सुरक्षेचे कारण देत सर्व जहाजांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समुद्रातील सुरुंगांशी होणारी संभाव्य धडक टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा इराणने केला आहे.
इराणचा लष्करी इशारा
पर्शियन आखातातील तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना इराणने थेट इशारा दिला आहे. जर कोणत्याही जहाजाने इराणची पूर्वपरवानगी घेतली नाही किंवा टोल भरण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर इराणच्या लष्कराकडून हल्ले केले जाऊ शकतात. या जलमार्गाबाबतचे सर्व अंतिम निर्णय इराणची 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषद' घेते. इराणच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून, सागरी विमा दरांमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम
जगाच्या एकूण तेल पुरवठ्यापैकी मोठा हिस्सा होर्मुझच्या अरुंद सामुद्रधुनीतून जातो. इराणने या मार्गावर लादलेले निर्बंध आणि प्रति बॅरल 1 डॉलरचा प्रस्तावित टोल यामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात येऊ शकते. अमेरिकेसोबतचा युद्धविराम केवळ 2 आठवड्यांचा असताना, इराणने घेतलेली ही भूमिका वाटाघाटींमध्ये आपले पारडे जड करण्यासाठी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. आता अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश इराणच्या या 'टोल' वसुलीला कसा प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.