PPF Investment Rules: जर तुम्ही सुरक्षित परताव्यासाठी 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी' अर्थात PPF मध्ये गुंतवणूक करत असाल, तर एप्रिल महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत कळीचे आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करताना तारखेचे गणित चुकल्यास तुम्हाला हजारो रुपयांच्या व्याजावर पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी 5 एप्रिलपूर्वी तुमची गुंतवणूक पूर्ण करणे आवश्यक आहे.
काय आहे '5 एप्रिल'चे गणित?
PPF नियमांनुसार, व्याजाची गणना महिन्याच्या 5 तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खात्यात असलेल्या 'किमान शिल्लकीवर' (Minimum Balance) केली जाते. याचा अर्थ असा की, जर तुम्ही तुमची रक्कम महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान जमा केली, तरच तुम्हाला त्या संपूर्ण महिन्याचे व्याज मिळते. जर तुम्ही 5 एप्रिलनंतर पैसे जमा केले, तर त्या रकमेवर एप्रिल महिन्याचे व्याज मिळणार नाही आणि व्याजाची गणना थेट मे महिन्यापासून सुरू होईल.
एका दिवसाचा विलंब आणि 887 रुपयांचे नुकसान
केवळ एका दिवसाचा उशीर तुमच्या खिशाला किती कात्री लावू शकतो, हे एका उदाहरणावरून स्पष्ट होते. समजा, तुम्ही वर्षाला 1.5 लाख रुपये PPF मध्ये गुंतवता. 5 एप्रिलपूर्वी गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक साधारण 10,650 रुपये व्याज मिळेल. तथापी, 5 एप्रिलनंतर गुंतवणूक केल्यास हेच व्याज कमी होऊन 9,763 रुपयांवर येईल. केवळ एका दिवसाच्या विलंबामुळे तुमचे 887 रुपयांचे थेट आर्थिक नुकसान होऊ शकते. दीर्घकाळात ही रक्कम चक्रवाढ व्याजामुळे मोठी भरते.
PPF योजनेचे फायदे आणि मर्यादा
PPF ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानली जाते, कारण यामध्ये 15 वर्षांचा 'लॉक-इन कालावधी' असतो. तुम्ही वर्षाला किमान 500 रुपयांपासून ते कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेवर अंदाजे 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. ही सरकारी योजना असल्याने तुमचे भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहते आणि आयकर सवलतीचा लाभही मिळतो. त्यामुळे, जर तुम्हाला या आर्थिक वर्षात पूर्ण व्याजाचा लाभ घ्यायचा असेल, तर उद्याच आपल्या PPF खात्यात पैसे जमा करण्याचे नियोजन करा.