Vijay Chaudhary Resignation: उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणात एक मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने पक्षसंघटनेत मोठी खळबळ उडाली आहे. माजी खासदार हिना गावित यांच्याविरोधात फोनवर अनुचित आणि अश्लील भाषेत संभाषण केल्याचा आरोप चौधरी यांच्यावर झाला असून, याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण वादानंतर चौधरी यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला.
आपल्या राजीनामा पत्रात विजय चौधरी यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या 13 वर्षांपासून पक्षात निष्ठेने कार्य करत असताना, आपली आणि पक्षाची प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधकांनी बनावट (मॉर्फ्ड) ऑडिओ क्लिप प्रसारित करून राजकीय कट रचल्याचा थेट दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी याची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.
हेही वाचा – Air India Building Mumbai: मंत्रालयाला मिळणार नवे प्रशासकीय केंद्र! एअर इंडिया इमारतीत होणार मंत्रिमंडळ बैठक
चौधरी यांच्या मते, पदावर राहून चौकशी झाल्यास पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात, म्हणूनच त्यांनी स्वखुशीने पदावरून दूर होण्याचा मार्ग निवडला. एका संभाषण क्लिपवरून थेट पक्षांतर्गत आणि पोलिसांत तक्रार होण्यापर्यंत गेलेला हा वाद आगामी काळात नंदुरबारमधील राजकीय समीकरणांवर काय परिणाम करतो, याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.