Vidhan Parishad Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. हा राजकीय पेच सोडवण्यासाठी आज शनिवारी सकाळपासूनच मुंबईत वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. जागांच्या अदलाबदलीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वरिष्ठ पातळीवर थेट चर्चा सुरू झाली आहे. चालू आठवड्यातच जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा महायुतीचा मानस असल्यामुळे आजच्या बैठकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
‘नंदनवन’ निवासस्थानी बड्या नेत्यांची खलबतं
जागावाटपाची कोंडी फोडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण हे आज सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये सध्या विधान परिषदेच्या जागांच्या समीकरणांवर अत्यंत गुप्त आणि महत्त्वाची चर्चा सुरू आहे.
शिवसेनेचा वाढीव दावा आणि जागांचे नवे गणित
एकूण 17 जागांसाठी महायुतीमध्ये प्राथमिक स्तरावर एक फॉर्म्युला ठरला होता, परंतु शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे हा तिढा वाढला आहे. प्राथमिक फॉर्म्युल्यानुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 जागा असे नियोजन होते. मात्र, केवळ 3 जागांवर तडजोड न करता शिवसेनेने आता थेट 6 ते 7 जागांवर हक्क सांगितला आहे. मागील निवडणुकांमध्ये पक्षाने केलेल्या चांगल्या कामगिरीचा हवाला देत शिवसेनेने हा दावा अधिक मजबूत केला आहे.
ठाणे, पुणे आणि संभाजीनगरमध्ये सर्वाधिक पेच
ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या 3 महत्त्वाच्या जागांवरून महायुतीत सध्या सर्वाधिक रस्सीखेच सुरू आहे. यातील ठाणे आणि संभाजीनगर या दोन्ही बालेकिल्ल्यांवर शिवसेनेने आपला पारंपारिक दावा ठोकला आहे, तर पुणे जागेवर भाजपकडे संख्याबळ जास्त असले, तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या जागेसाठी पूर्ण ताकद लावली आहे.
भाजप नेतृत्वासमोर मित्रपक्षांना सांभाळण्याचे दुहेरी आव्हान
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर पक्षांतर घडवून आणत आपले बळ वाढवले आहे. अशा स्थितीत मित्रपक्षांना म्हणजेच शिवसेनेला अधिक जागा सोडल्यास, राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक होऊन जादा जागांची मागणी करू शकते. त्यामुळे स्थानिक नेत्यांची आणि मित्रपक्षांची नाराजी न पत्करता जागांची अदलाबदल कशी करायची, याचे मोठे आव्हान भाजपच्या नेतृत्वासमोर उभे ठाकले आहे.