Pune Congress Protest: दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. या लाठीमाराच्या घटनेविरोधात काँग्रेस पक्षाने पुण्यातील राजभवनाबाहेर जोरदार निदर्शने केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा धिक्कार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. तसेच, हातात काळे झेंडे घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ; शहर काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
या आंदोलनाचे नेतृत्व करताना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “देशातील तरुणांच्या भवितव्याशी खेळ सुरू असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अजूनही पदावर कसे काय राहू शकतात? टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या वेदनांची सरकार उघडपणे थट्टा करत आहे.” विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी असून, आगामी काळातही हा पाठिंबा कायम राहील, असा पुनरुच्चार जगताप यांनी केला.
राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या वर्तनाचा तीव्र निषेध
जंतरमंतर येथील घटनेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ज्या प्रकारे ताब्यात घेतले, त्यावरूनही पुण्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांच्या पदाचा आणि जनभावनेचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने या संपूर्ण प्रकाराचा निषेध नोंदवला. दिल्लीतील आंदोलनाचे लोन महाराष्ट्रात पोहोचल्याने येत्या काळात हे राजकीय वातावरण आणखी पेटण्याची शक्यता आहे.