Indian Mangoes In USA: भारतीय उन्हाळ्याची खरी ओळख असलेला आंबा आता सातासमुद्र पार करून अमेरिकन बाजारपेठेत आपला गोडवा पसरवत आहे. या आठवड्यात अमेरिकेतील सिएटल भागात भारतीय आंब्यांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाले असून, तेथील ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. विशेष म्हणजे, आता हे आंबे केवळ भारतीय दुकानांपुरते मर्यादित न राहता 'Costco' सारख्या अमेरिकेतील आघाडीच्या रिटेल स्टोअर्समध्येही विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यामुळे भारतीय आंबा खऱ्या अर्थाने अमेरिकन जीवनशैलीचा भाग बनत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरांचा आकडा ऐकून व्हाल थक्क
अमेरिकेतील विविध वेबसाइट्सवर दिलेल्या किमतींनुसार, 'केसर' आंब्यांच्या 4 नगांच्या एका पॅकची किंमत सध्या 20 डॉलर्स (सुमारे 1,919 रुपये) इतकी आहे. भारतात याच किमतीत डझनावारी आंबे सहज उपलब्ध होतात, मात्र अमेरिकेत हा दर अधिक असूनही ग्राहकांची मागणी मोठी आहे. सिएटल, लिनवुड, एडिसन आणि नॉर्थ ब्रन्सविक यांसारख्या शहरांमधील मोठ्या मॉल्समध्ये हे आंबे आता सरासरी ग्राहकांसाठी सहज उपलब्ध झाले आहेत.
सिएटलमध्ये 'आंबा मुत्सद्देगिरी' (Mango Diplomacy)
भारताचे महावाणिज्यदूत प्रकाश गुप्ता यांनी सिएटलमध्ये भारतीय आंब्यांच्या प्रचारासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांनी 'Fox-13 News' वाहिनीवर हजेरी लावून भारतीय आंब्यांचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या 1 वर्षापासून भारतीय आंबा अमेरिकेतील मोठ्या किरकोळ विक्री साखळ्यांमध्ये (Retail Networks) पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू होते, ज्याला आता यश आले आहे. "भारतात आंबा हे केवळ फळ नसून उन्हाळ्यातील कौटुंबिक आठवणींचा एक भाग आहे, तोच गोडवा आम्ही अमेरिकेत आणला आहे," असे त्यांनी नमूद केले.
जागतिक उत्पादनात भारताचा दबदबा
भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश असून, जगाच्या एकूण उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक उत्पादन भारतात होते. 'केसर', 'हापूस' (Alphonso), 'दशेरी' आणि 'लंगडा' या जातींना त्यांच्या विशिष्ट सुगंध आणि चवीमुळे जागतिक स्तरावर मोठी पसंती मिळते. सध्या अमेरिकेत 'केसर' जातीचा आंबा दाखल झाला असून, येत्या काही आठवड्यांत हापूससह इतर जातीही बाजारपेठेत दाखल होणार आहेत. एकेकाळी दुर्मिळ असलेला भारतीय आंबा आता अमेरिकन घराघरांत पोहोचत आहे.