Raj Thackeray Gudi Padwa Melava: ‘ज्या इराणने कठीण काळात भारताला साथ दिली, त्या इराणच्या पडत्या काळात आपण त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. या धोरणात्मक चुकीचा देशाला भविष्यात मोठा फटका बसेल,’ अशा स्पष्ट आणि रोखठोक शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भारताच्या परराष्ट्र भूमिकेवर आपले मत मांडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. जागतिक घडामोडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण त्याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचे ओझे
राज ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करताना सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचे कर्ज होते, जे आज तब्बल 11 लाख कोटींवर गेले आहे. एकीकडे विकास आणि 3 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या गप्पा मारल्या जात आहेत, पण वास्तवात राज्य कर्जाच्या विळख्यात अडकले आहे. तसेच, मुंबईसह राज्यातील शहरांच्या नियोजनशून्य विस्तारावर त्यांनी टीका केली. शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या गंभीर झाली असून कोणालाही कशाच्याही परवानग्या दिल्या जात असल्याने शहरे कोलमडून पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोस्टल रोड आणि उद्योगपतींवर टीका
मुंबईतील कोस्टल रोडच्या प्रकल्पावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला. “हा रस्ता तुमच्या-आमच्या सोयीसाठी नाही, तर इतरांना शहरात शिरकाव करण्यासाठी बनवला जात आहे,” असे ते म्हणाले. अदानींसारखे मोठे उद्योगपती जमिनी घेत आहेत आणि त्यातून महाराष्ट्र आपली मूळ ओळख गमावत चालला आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली.
तरुणांना मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडण्याचे आवाहन
सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला राज ठाकरेंनी मोलाचा सल्ला दिला. “इन्स्टाग्रामच्या आभासी जगातून बाहेर या. तुम्ही केवळ मोबाईलवर राग व्यक्त करावा आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरू नये, असे सत्ताधाऱ्यांना वाटते,” असा टोला त्यांनी लगावला. तरुणांनी केवळ कमेंट्समध्ये अडकून न पडता वास्तवातील प्रश्नांसाठी लढावे, असे त्यांनी आवाहन केले. भाषा आणि संस्कृती संपली की देश संपतात, त्यामुळे आपली भाषा आणि जमीन वाचवण्यासाठी आताच जागे होण्याची वेळ आली आहे, असा खणखणीत इशारा त्यांनी मनसैनिकांना दिला.