Satara ZP Results: सातारा जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामात आज एका 22 वर्षांच्या तरुणीने 'जाएंट किलर' ठरत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंद्रळ कोळे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या (शिंदे गट) मृणाल पाटील यांनी भाजपचे दिग्गज नेते आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा धक्कादायक पराभव केला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खेळलेली ही 'तरुण' खेळी यशस्वी ठरली असून भाजपसाठी हा मोठा राजकीय सेटबॅक मानला जात आहे. नरेंद्र पाटील यांनी आपल्या पत्नीच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र मतदारांनी युवा चेहऱ्याला पसंती दिली आहे.
प्रस्थापित नेत्यांच्या घरातील उमेदवारांना मतदारांनी नाकारले
या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद देऊन बळ दिले होते, त्यामुळे या विजयाची खात्री भाजपला होती. मात्र, शंभूराज देसाईंचे सूक्ष्म नियोजन आणि मृणाल पाटील यांच्या रूपाने मिळालेला नवा चेहरा यामुळे युवा मतदार शिवसेनेकडे वळला. निकाल जाहीर होताच मृणाल पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला, तर दुसरीकडे पराभवाच्या धक्क्याने भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.
मंत्री जयकुमार गोरे यांना बालेकिल्ल्यात दुहेरी फटका
केवळ नरेंद्र पाटीलच नव्हे, तर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही त्यांच्या बालेकिल्ल्यात 2 मोठे धक्के बसले आहेत. माण तालुक्यातील कुकडवाड गटातून जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, औंध जिल्हा परिषद गटातून जयकुमार गोरे यांच्या वहिनी भारती गोरे यांचाही पराभव झाला असून येथे राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना निवडून आणण्यात अपयश आल्याने जयकुमार गोरे यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे.
साताऱ्यातील निकालाचे दूरगामी परिणाम
साताऱ्याच्या ग्रामीण राजकारणात भाजपला मोठे खिंडार पडल्याचे या निकालांवरून दिसत आहे. विशेषतः प्रस्थापित नेत्यांच्या घरातील उमेदवारांना नाकारून मतदारांनी नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे. 22 वर्षीय मृणाल पाटील यांचा विजय हा या पूर्ण निवडणुकीतील सर्वात चर्चेचा विषय ठरला असून, यामुळे जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.