Pune Municipal Corporation: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करणार? की स्वतंत्रपणे उतरणार? याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आमच्या बाजूने एकत्र येण्याने विरोधकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत 29 महापालिकांतील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत.
या महापालिकांमध्ये अजित पवार आणि भाजप यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये अजित पवार यांना पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला होता. आता 2026 मध्ये या दोन महानगरपालिकांमध्ये अजित पवार गटाला विजय मिळवणे मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तयारीवर बोलताना फडणवीस म्हणाले, 15 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व महापालिकेतील निवडणुका होणार आहेत. गेल्या काही वर्षांत निवडणुका झाल्या नाहीत. आमच्या सरकारने केलेल्या कामांमुळे यावेळी महापालिका निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने येईल अशी आम्हाला खात्री आहे. काही ठिकाणी भाजप-शिवसेना युती राहील, तर काही ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी युती दिसेल. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी थेट भिडणार असून ही मैत्रीपूर्ण लढत असेल.
तथापी, फडणवीस पुढे म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर आम्ही पूर्णपणे एकत्र आलो असतो, तर विरोधकांना फायदा झाला असता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत ठेवणे अधिक योग्य ठरेल. शिवसेना बहुतेक ठिकाणी आमच्या युतीत सहभागी आहे. तरीही या दोन महापालिकांमध्ये अजित पवारांचा पक्षही बलवान आहे.
भाजपमध्ये नवीन उमेदवार कोण असणार या प्रश्नावर ते म्हणाले, भाजपमध्ये उमेदवारांचा ओघ आहे, परंतु कोणाला घेणे आणि कोणाला नाही, हे निर्णय आमच्या पक्षाध्यक्ष घेतील. मुंबई महापालिकेत ठाकरे दोन्ही एकत्र आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही येत्या निवडणुकीत मुंबई महापालिका नक्कीच जिंकू, असा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.